लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरेगाव : तालुक्यातील गोठणगाव येथे शुक्रवारी दि.१ जून रात्री घडलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे. घरामागे शौच करून परत येत असलेल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर बिबट्याने अचानक हल्ला केला. सुमारे १५ मीटर अंतरापर्यंत तिला फरफटत नेले. परंतु, प्रसंगावधान राखत आरडाओरड करणाऱ्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी धाव घेतल्याने बिबट्याने मुलीला सोडून जंगलाकडे पलायन केले. या प्रकारामुळे त्या चिमुकलीचे प्राण थोडक्यात वाचले, मात्र तिच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे.
जखमी बालिकेचे नाव युक्ता मारोती निखारे (वय ४) असे असून, ती गोठणगाव येथील रहिवासी आहे. सध्या तिच्यावर गोठणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
जंगलानजीकच्या वस्तीत भीतीचं सावट..
गोठणगाव परिसर हा निसर्गरम्य असला तरी वन्यप्राण्यांच्या वावरामुळे सतत धोक्याच्या सावटाखाली आहे. बिबट्या, अस्वल, रानडुक्कर यांचा वावर परिसरात नियमित असल्याची माहिती ग्रामस्थ देतात. शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. युक्ता निखारे ही शौचासाठी घराच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयात गेली होती. परत येत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घातली व मानेला धरून फरफटत नेऊ लागला.
युक्ताच्या किंकाळ्या ऐकून तिचे आई-वडील आणि शेजारी तातडीने धावून आले. सर्वांनी एकत्रित आरडाओरड केली. या अचानक झालेल्या गोंधळामुळे बिबट्याने युक्ताला सोडून दिले आणि जंगलाच्या दिशेने पसार झाला. तत्क्षणी युक्ताला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
वनविभागाची घटनास्थळी धाव; गस्त सुरू करण्याची हमी…
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि संपूर्ण परिसराची पाहणी केली. पंचनामा करत त्यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले. विशेषतः संध्याकाळी व रात्री लहान मुलांना एकटे बाहेर न सोडण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, परिसरात गस्त वाढविण्याचे आश्वासनही वनविभागाकडून देण्यात आले आहे.
जंगल लागून असलेल्या गावांतील प्रश्न गंभीर..
या घटनेमुळे गोठणगाव आणि आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘शौचालयासारख्या मूलभूत गरजेसाठी घराबाहेर पडतानाही जीव मुठीत धरावा लागत असेल, तर ही केवळ जीवसुरक्षेची नव्हे, तर प्रशासनिक दुर्लक्षाची गंभीर बाब आहे,’ असे संतप्त प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
बालकांसाठी सुरक्षित पर्याय, जंगल सीमेवर संरक्षणात्मक उपाययोजना, बिबट्याच्या हालचालींचे निरीक्षण यांसाठी आता ग्रामस्थांनी ठोस उपायांची मागणी सुरू केली आहे.