लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोलीसारख्या दुर्गम व संवेदनशील भागात अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस दलाच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गडचिरोली पोलीस दल आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने 30 आणि 31 मे 2025 रोजी दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात एकूण 760 पोलीस अधिकारी, अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी यांनी सहभाग घेत वैद्यकीय तपासणी करून घेतली. या उपक्रमामुळे पोलीस दलाच्या आरोग्याकडे सकारात्मक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून लक्ष दिले गेले, हे विशेष!
माओवादविरोधी अभियानात आघाडीवर असलेले अधिकारीही सहभागी..
जिल्ह्यातील माओवादविरोधी मोहिमा, बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था, गुन्हे तपास अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना गडचिरोली पोलीस दल कायम सज्ज असते. अशा कामात गुंतलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ मानसिक आणि शारीरिक तणावाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला भरभरून प्रतिसाद मिळाला.
आरोग्य शिबिरात करण्यात आल्या या तपासण्या …
शिबिरामध्ये विविध वयोगटांतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची ब्लड शुगर, लिपिड प्रोफाईल, सीबीसी, मूत्रपिंड आणि यकृत कार्य तपासणी, थायरॉईड, रक्तदाब इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपले आरोग्यदृष्ट्या संभाव्य धोके वेळेवर समजले आणि त्यानुसार वैद्यकीय सल्लाही मिळाला.
सुसूत्र आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणी…
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मुख्यालयातील बहुउद्देशीय मंगल कार्यालयात हे शिबिर पार पडले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, अति. शल्यचिकित्सक डॉ. सतिश सोळंकी, निवासी आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे आणि त्यांच्या तज्ञ पथकाच्या सहकार्याने करण्यात आले.
पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी पो.उ.नि. नरेंद्र पिवाल व त्यांच्या टीमने यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली.
कल्याणकारी उपक्रमांची पुढची पायरी..
गडचिरोली पोलीस दलाकडून वेळोवेळी अधिकारी व अंमलदारांच्या सामाजिक, मानसिक व आरोग्यविषयक कल्याणासाठी विविध उपक्रम राबवले जातात. हे आरोग्य शिबिर ही त्या मालिकेतील आणखी एक मोलाची भर ठरली आहे. यामुळे पोलीस दलात तंदुरुस्त शरीर, सशक्त मन आणि सजग सेवा या दिशेने सकारात्मक ऊर्जा मिळाली.