लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर
गडचिरोली जिल्ह्यात प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या झाले असून गडचिरोलीचा ४३ वा स्थापना दिन हा केवळ औपचारिक सोहळा नाही, तर या जिल्ह्याच्या परिवर्तनाची साक्ष आहे. जंगल, डोंगर आणि मागासलेपणाशी जोडल्या गेलेल्या गडचिरोलीची प्रतिमा आता झपाट्याने बदलत आहे. या बदलाचा केंद्रबिंदू म्हणजे लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड.
सुरजागड लोहखनिज खाणीपासून ते कोनसरी येथे उभ्या राहणाऱ्या पोलाद प्रकल्पापर्यंतची वाटचाल ही केवळ औद्योगिक उभारणी नसून गडचिरोलीच्या भवितव्याचा आराखडा आहे. या प्रकल्पातून हजारो युवकांना रोजगार, महिलांसाठी नवनव्या संधी आणि समाजाच्या सर्व स्तरांना विकासाच्या प्रवाहात सामील होण्याची संधी मिळत आहे. महिलांना ड्रायव्हर म्हणून घडविणारा कार्यक्रम हा बदल घडविणाऱ्या सामाजिक क्रांतीचा प्रारंभ मानावा लागेल.
विकासाच्या या प्रवासात निसर्गाचा तोल जपणे तेवढेच महत्त्वाचे आहे. शहरात तीस हजारांहून अधिक आणि जिल्ह्यात अकरा लाख वृक्षारोपण करून लॉईड्सने पर्यावरणाचे रक्षण करण्याचा वसा घेतला आहे. दरवर्षी दीड लाख रोपे निर्माण करणारी जागतिक दर्जाची नर्सरी ही या प्रयत्नांची पराकाष्ठा आहे.
शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांतही गडचिरोलीच्या नशिबी नवे अध्याय लिहिले जात आहेत. लॉईड्स राज विद्या निकेतन शाळेपासून ते ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे उच्च शिक्षण मिळत आहे. गोंडवाना विद्यापीठ व कर्टिन विद्यापीठाशी झालेले करार हे भविष्यातील तंत्रज्ञान व खाण अभियंते घडविण्याचा भक्कम पाया घालत आहेत.
काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून दीड लाखांहून अधिक लोकांना आरोग्यसेवा मिळाली आहे. दुर्गम भागात आरोग्यसेवेची अशी सुविधा मिळणे हे समाजजीवनासाठी मोठे पाऊल आहे. हेड्री आणि मंगेर येथील तलावांचे पुनरुज्जीवन करून जलसंपदा आणि निसर्ग दोन्ही जपण्याचा आदर्श ठेवण्यात आला आहे.
आज गडचिरोलीचा विकास हा केवळ आकड्यांत मांडण्याजोगा नाही; तो लोकांच्या जीवनात उतरलेला आहे. रोजगार, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन – या साऱ्यांतून गडचिरोलीचा चेहरा बदलतो आहे.स्थापना दिनाच्या या पर्वावर गडचिरोली अभिमानाने सांगू शकते हा जिल्हा आता मागे नाही, तो प्रगतीचा दीपस्तंभ झाला आहे.