दंडकारण्यातून आत्मनिर्भरतेकडे… 120 युवक-युवतींना चारचाकी चालक प्रशिक्षण; 1130 जणांना आतापर्यंत रोजगाराची दिशा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : माओवादाच्या सावटाखाली दशकानुदशके जगलेल्या दुर्गम-अतिदुर्गम भागातील युवक-युवतींसाठी रोजगाराचा नवा मार्ग खुला करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. गडचिरोली पोलीस दलच्या ‘दादालोरा खिडकी’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट उडान’मधील चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 120 प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ आज पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉलमध्ये उत्साहात पार पडला.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्किलिंग इन्स्टिट्यूट, पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली आणि कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान अंतर्गत 13 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हे प्रशिक्षण राबविण्यात आले.

एटापल्ली, जिमलगट्टा, सिरोंचा आणि इतर दुर्गम उपविभागांतील 90 पुरुष व 30 महिला अशा एकूण 120 युवक-युवतींनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. वाहनचालक म्हणून आवश्यक सैद्धांतिक ज्ञान, प्रत्यक्ष प्रशिक्षण, वाहतूक नियमांची माहिती आणि जबाबदार वाहनचालकाची जाणीव यांचा समावेश असलेल्या या अभ्यासक्रमानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना लर्निंग परवाने काढून देण्यात आले असून कायमस्वरूपी परवाना प्रक्रियाही सुरू आहे.

विशेष म्हणजे, या स्किलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आतापर्यंत 1130 युवक-युवतींना चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना कायमस्वरूपी परवाने मिळवून देण्यात आले आहेत. दुर्गम भागातील युवकांना कौशल्याधारित रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्याचा आधार मिळत आहे.

निरोप समारंभात अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांनी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली. “कौशल्य म्हणजे आत्मविश्वासाचा पाया आहे. या प्रशिक्षणाच्या बळावर प्रत्येकाने स्वावलंबी बनून आपल्या कुटुंबाच्या उन्नतीस हातभार लावावा,” असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे व उपपोस्टे प्रभारी अधिकारी, नागरी कृती शाखेचे प्रभारी पोउपनि. चंद्रकांत शेळके तसेच पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

माओवादाच्या प्रभावाखालील भागात केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्यापलीकडे जाऊन विकासाची नवी दारे उघडण्याचा हा प्रयत्न आहे. जंगलातील युवकांच्या हातात आता शस्त्र नव्हे, तर स्टिअरिंग येत आहे—आणि त्या स्टिअरिंगमधूनच त्यांच्या भविष्याची नवी दिशा निश्चित होत आहे.

Naxal divert normal life
Comments (0)
Add Comment