गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील डाटा सेंटर चे उद्घाटन व मॉडेल कॉलेज चे भूमिपूजन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या हस्ते संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली, 4 फेब्रुवारी: गोंडवाना विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गडचिरोली येथे दिली.

गोंडवाना विद्यापीठ येथे पहिल्यादा 14 सप्टेंबर 2020 रोजी मंत्री म्हणून ना. उदय सामंत हे गडचिरोलीत आल्यानंतर त्यांच्या पुढे चार प्रमुख प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यापैकी विद्यापीठाला 12-बी ची मान्यता, मॉडेल कॉलेज चे हस्तांतरण व डेटा सेंटरची निर्मिती या तीन प्रश्नांची सोडवणूक झाली असून चौथ्या प्रश्नावर अर्धे काम झाले आहे. आगामी तीन महिन्यात गोंडवाना विद्यापीठाला आदिवासी आणि वन विद्यापीठाचा विशेष दर्जा देण्याचे काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आहे. गोंडवाना विद्यापीठातील डाटा सेंटर हे महाराष्ट्रातील उत्तम डाटा सेंटर निर्माण झाले असून त्याचा विद्यार्थ्यांना व सर्व संबंधितांना लाभ होईल. आज भूमिपूजन झालेले मॉडेल कॉलेज हे गडचिरोलीची नवी ओळख व्हावी. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले.

शासकीय विज्ञान महाविद्यालयात कला आणि वाणिज्य विभाग सुरू करण्याची व महाविद्यालयाला पाच एकर जागा उपलब्ध करून देऊन तेथे भव्य क्रीडा संकुल उभारण्याची घोषणाही त्यांनी केली. गोंडवाना विद्यापीठाच्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करीता प्रथम चरणात 50 एकर जागा अधिग्रहीत करण्याचे काम करावे आणि लगेच उपलब्ध असलेल्या 18 एकर जागेवर बांधकाम सुरू करण्यात यावे. जेणेकरून विद्यापीठाला प्राप्त झालेले 90 कोटी रुपये परत जाणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रभारी कुलगुरू डॉक्टर श्रीनिवास वरखेडी, आमदार डॉक्टर देवराव होळी, शिक्षण संचालक डॉक्टर अभय वाघ, डॉक्टर धनराज माने, नगराध्यक्ष योगिता पिपरे, प्र. कुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे, कुलसचिव डॉक्टर अनिल चिताडे व विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य मंचावर उपस्थित होते.

uday samant