लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,ता.१ नोव्हेंबर : आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त आणि अविकसित भामरागड तालुक्यातील भुसेवाडा या गावच्या नागरिकांनी शासनाच्या मदतीची वाट न बघता श्रमदानातून नाल्यावर पूल उभारला आहे. बांबूपासून बनविलेल्या या पुलामुळे गावकऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीही गैरसोय दूर झाली आहे.
मल्लमपोडूर ग्रामपंचायतींतर्गत भुसेवाडा गावाचा समावेश होतो. संपूर्ण गाव आदिवासीबहुल. पक्याां रस्यापाचा अभाव आणि जंगलव्याप्त असलेल्या गावाच्या अलीकडे एक नाला आहे. बाराही महिने या नाल्यात पाणी असते. पावसाळ्यात तर पुरामुळे परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटायचा. शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी इत्यादी कर्मचाऱ्यांना गावात जायचं म्हटलं तर पुलाच्या अलीकडेच मोटारसायकल ठेवून पाण्यातून मार्गक्रमण करीत गाव गाठावं लागायचं.
आजारी व्यक्तीला दवाखान्यात न्यायचं म्हणजे कसरतीचच काम. कोरोनासारख्या संकटात तर अडचणीत आणखीनच भर पडली. नागरिक पूल बांधण्यासाठी शासन आणि प्रशासनाला विनंती करुन थकले. अखेर नागरिकांची गैरसोय दूर करावी, यासाठी ग्रामसेवक अविनाश गोरे यांनी लोकसहभागातून पूल बांधण्याची योजना आखली. त्यासाठी त्यांनी ग्रामसभा बोलावली. तीत श्रमदानातून बांबूचा पूल बांधण्याची कल्पना लोकांपुढे मांडली. लोकांनी त्यास होकार दिला. गावातील महिला आणि पुरुष पूल बांधण्यासाठी श्रम उपसू लागले. पाहतापाहता भुसेवाड्याच्या नाल्यावर एक सशक्त पूल उभा झाला. ‘गाव करी, ते राव न करी’, म्हणतात ते यालाच!