लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रवि मंडावार
“रोग नव्हे तर रस्ता ठरतो जीवघेणा… आदिवासी माणसाच्या जगण्याचा हा उघड नागडा दस्तऐवज आहे”…
गडचिरोली दि,३ऑगस्ट : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम पेंदूळवाही गावात २ ऑगस्ट रोजी घडलेली ही घटना पुन्हा एकदा शासनाच्या आरोग्य यंत्रणेचा आणि पायाभूत सुविधांच्या दैन्याचा पर्दाफाश करणारी ठरली. स्वतःच्या शेतात धान लागवडीसाठी ट्रॅक्टरने चिखलणी करताना अपघातग्रस्त झालेल्या तरुणाला, रुग्णवाहिका न मिळाल्याने, कुटुंबीयांनी खाटेची कावड करून घनदाट जंगलातून तब्बल तीन किलोमीटर पायपीट करत आरोग्य केंद्रात नेले.
मनीरामच्या दुःखाला खांद्यांचा आधार..
मनीराम रामा हिचामी (३५) या पेंदूळवाहीतील तरुणाचा ट्रॅक्टर चिखलात घसरून उलटल्याने गंभीर अपघात झाला. पाठीला मार लागलेला, हालचाल अशक्य झालेला मनीराम, मदतीसाठी निपचित पडलेला… पण गावात रुग्णवाहिकेचा पत्ता नाही. जारावंडी आरोग्य केंद्रात फोन लावण्यात आला, पण तिथली एकमेव रुग्णवाहिका दुसऱ्या रुग्णासोबत गडचिरोलीला गेलेली. मोबाइलच्या सिग्नलसाठी झाडावर चढणारे हेच लोक आता रुग्णाला जीवदान देण्यासाठी खांद्यावर उचलून चालू लागले.
खाटेची कावड – म्हणजे एक न बोलता आक्रोश होता…
३ किलोमीटरची रात्र, जंगलाचा धाक आणि थरथरती माणसं रस्ताच नसल्याने कोणतेही वाहन गावात येऊ शकत नव्हते. तीन किलोमीटर घनदाट जंगल, पावसाळ्यातले चिखलट दगडधोंडे, सांपापासून भीती, अन् रात्रीची वेळ… अशा भयग्रस्त आणि थकवणाऱ्या अवस्थेत कुटुंबीय व गावकरी मनीरामला उचलून चालले होते. त्यांच्या खांद्यावर फक्त मनीराम नव्हता – तर त्यांचं स्वतःचं सामाजिक अपमान आणि शासकीय दुर्लक्षही होतं.
आरोग्य केंद्राचं अंतर ४२ किलोमीटर, पण नियोजन शून्य..
पेंदूळवाही हे गाव एटापल्ली मुख्यालयापासून ४२ किलोमीटर अंतरावर आहे. तालुक्यात जेमतेम पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. रुग्णवाहिका देखील मर्यादित आणि सतत अनुपलब्ध. जारावंडी केंद्राने तात्पुरत्या उपाययोजनेत स्वतःचे खासगी वाहन पाठवून रुग्णाला उपचारासाठी नेले खरे, पण तोपर्यंत कित्येक तास उलटले होते.
“वाहन नव्हतं… रस्ताच नव्हता… पण खांद्यावर नातं होतं.”..
आरोग्याची साधी हाकही आदिवासीला ऐकू येत नाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी यासंदर्भात सांगितले की, रुग्णवाहिका दुसऱ्या गावी गेल्याने विलंब झाला, आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पर्यायी वाहनाने रुग्णाला आणले. पण या सफाईने एक प्रश्न अनुत्तरित राहतो — आरोग्याचा मूलभूत हक्क असलेली सेवा ही जंगली गावांत पोहोचविण्याची जबाबदारी कुणाची? ज्या गावात ना रस्ता, ना टेलिफोन सुविधा, ना पक्कं आरोग्य केंद्र – तिथे यंत्रणांचे आराखडे फक्त कागदावरच उरतात.
पायाभूत सुविधा की फक्त घोषणांची माळ?…
वर्षानुवर्षे ‘सर्वांपर्यंत आरोग्य’, ‘दुर्गम भागासाठी विशेष यंत्रणा’, ‘नक्षलग्रस्त भागांत विकास’ – अशा घोषणा केल्या जातात. पण पेंदूळवाही सारख्या गावात आजही माणूस अपघातानंतर जीव वाचवण्यासाठी स्वतःचं मृत्यू विरुद्ध युद्ध खांद्यावर लढतो, ही बाब शासनाच्या सर्व योजना, CSR प्रकल्प, ग्रामविकास समित्या यांचं दिवाळं वाजवणारी आहे.
प्रश्न फक्त एका गावाचा नाही – संपूर्ण व्यवस्थेचा आहे…
पेंदूळवाहीतील ही घटना एखादा अपवाद नाही – तर आज हजारो दुर्गम आदिवासी गावांची प्रत्यक्ष स्थिती आहे. दर पावसाळ्यात या भागात अपघात, सर्पदंश, प्रसूतीसाठी चालत जाणं, औषध न मिळाल्यानं मृत्यू – या बातम्या वारंवार समोर येतात. पण प्रत्येक वेळेस प्रशासन फक्त “वाहन उपलब्ध नव्हतं”, “रस्ता नादुरुस्त होता”, “कर्मचारी अनुपस्थित होता” – अशी उत्तरं देत जबाबदारी झटकतं.
आता तरी सरकार, ऐकतोयस का…?
खरे तर यंत्रणेने आता आरशात पाहायला हवे – कारण पेंदूळवाहीचा हा प्रसंग फक्त एक कळवळा नाही, तर माणसाच्या अस्मितेचा अवमान आहे.आरोग्य ही सेवा आहे, पण आदिवासी भागात ती अजूनही दया-दानासारखी वाटते. हे चित्र बदलायचं असेल, तर केवळ योजनांचे उद्घाटन नव्हे – तर रस्ते, रुग्णवाहिका, आणि डॉक्टरांची तत्काळ उपलब्धता ही हक्काने मिळणारी गरज झाली पाहिजे…
मैत्री: केवळ बंध नव्हे, तर माणसाला माणसाशी जोडणारा एक स्नेहसंपर्क
गोंडी शाळेचा लंडनशी संवाद : मोहगावच्या विद्यार्थ्यांची स्वप्नांना आंतरराष्ट्रीय दिशा