गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालय जिल्हयाची गरज पूर्ण करत आहे – मंत्री विजय वडेट्टीवार

सद्यस्थिती व विविध उपाययोजनांचा घेतला आढावा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २९ एप्रिल: जिल्हयात कोरोना उपचाराबाबत एकही खाजगी हॉस्पीटल्स नसताना जिल्हयातील सर्व कोविड रूग्णांना आवश्यक आरोग्य सेवा देवून, जिल्हा सामान्य रूग्णालयाने जिल्हयाची गरज पुर्ण केली आहे असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे केले. ते कोरोनाबाबत सद्यस्थिती व विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी गडचिरोली येथे आले होते. वडेट्टीवार यांनी जिल्हयातील ऑक्सिजन, रेमडीसिवर, बेड्सची उपलब्धता यावर माहिती जाणून घेतली.  यावेळी त्यांनी जिल्हयातील रूग्णांना आवश्यक मदत देण्यासाठी सहकार्य करा व रूग्णांची तपासणी प्रोटोकॉल नूसार करून चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घ्या असे निर्देश उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. जिल्हयातील आरोग्य यंत्रणा टीम वर्कने अतिशय चांगले कार्य करत असल्याचे मंत्र्यांनी यावेळी उद्गार काढले. बैठकीमध्ये मंत्री महोदयांना कोविड परिस्थितीबाबतची माहिती डॉ.अनिल रूडे यांनी दिली. यावेळी नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी, जिल्हापरिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, उपाध्यक्ष मनोहर पोरेड्डी पाटील, जिल्हा परिषद सदस्य ॲड. हरीभाऊ मेश्राम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सोळंकी, डॉ. मुकूंद ढबाले उपस्थित होते.

यावेळी त्यांनी कोरोना वार्डाबाहेर जावून त्याठिकाणीची पाहणी केली. यावेळी घेतलेल्या बैठकीत त्यांनी जिल्हयातील कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी रूपरेषा तयार करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हयातील पॉझिटीव्हीटी रेट इतर जिल्हयांच्या तुलनेत बरा आहे. मात्र कोरोना मुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या नियंत्रणात येणे आवश्यक आहे. जिल्हयातील डबलींग रेटही खूप असून आपल्याला संसर्ग साखळी तोडण्यासाठी रूग्णांच्या संपर्कातील इतरांचा शोध घेणे पण आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. लसीकरणाबाबत बोलताना ते म्हणाले की जरी लसींचा पुरवठा कमी असला तरी जिल्हयातील लसीकरणाची टक्केवारी राज्याच्या तुलनेत कमी आहे. आता लोकांना लसीकरणाची गरज लक्षात आली आहे. लसींचा पुरवठा पुर्ववत झाल्यावर जिल्हयातील लसीकरण वाढविणे गरजेचे आहे.

चांगले जेवण व कूलरची व्यवस्था करा : सद्या उन्हाळयाचे दिवस आहेत. रूग्णांना चांगले जेवण व पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. त्यामूळे कोविड केअर सेंटर्समध्ये कूलरची व्यवस्था करावी. तसेच चांगल्या दर्जाचे जेवणही पुरवावे. जेणेकरून रूग्णांना संसर्गातून बरे होण्यास मदत मिळेल अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्हयातील तापमान जास्त असल्यामूळे बहूतेक ठिकाणी काही अडचणही आल्या पण सद्या त्या दूर करत आहे. याबाबत तालुकास्तरावर कार्यवाही करणेबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले.

नागरिकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी निर्बंधांची अंमलबजावणी काटेकोर करावी : गडचिरोली जिल्हयातील कोरोना रूग्णांची संख्या एप्रिल महिन्यात झपाट्याने वाढली. ती नियंत्रित ठेवण्यासाठी राज्य शासनाने राज्यासह गडचिरोली जिल्हयात आवश्यक निर्बंध घातलेले आहेत. याची अंमलबजावणी नागरिकांकडून होणे आवश्यक आहे. लोकांनी विनाकारण बाहेर न पडता आपली व आपल्या कुटंबांची जबाबदारी घ्यावी असे आवाहन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

ajay kankadalwarDipak SinglaDr. Shashikant ShambharkarVijay Wadettiwar