‘संपूर्णता’ अभियानात गडचिरोली जिल्ह्याचा देशपातळीवर ठसा; जिल्हा व दोन तालुक्यांना ‘ब्राँझ’ सन्मान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. ४ ऑगस्ट : नीती आयोगाच्या ‘संपूर्णता’ या महत्त्वाकांक्षी अभियानात गडचिरोली जिल्ह्याने आपली ठसा उमटवणारी कामगिरी बजावत देशपातळीवर गौरव प्राप्त केला आहे. आकांक्षित जिल्हा म्हणून निवडण्यात आलेल्या गडचिरोलीला या अभियानातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘ब्राँझ’ पदकाने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, अहेरी आणि भामरागड या दोन तालुक्यांनीही स्वयंपूर्ण विकासाच्या दिशेने लक्षणीय वाटचाल करत स्वतंत्रपणे ‘ब्राँझ’ मानांकन पटकावले आहे.

हा सन्मान नुकताच नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) येथे २ व ३ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या राज्य महसूल परिषदेत प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना या गौरवचिन्हाने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव विकास खारगे, सचिव श्रीकर परदेशी व अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

‘संपूर्णता’ अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील मागास व आकांक्षित जिल्ह्यांमध्ये आरोग्य, शिक्षण, पोषण आणि पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांमध्ये संपूर्णता गाठणे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने ९ ते ११ वयोगटातील मुलांचे लसीकरण, शालेय विद्युत सुविधा व पाठ्यपुस्तक वितरण यामध्ये १०० टक्के उद्दिष्टांची पूर्तता केली.

तालुकास्तरावर अहेरीने मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी, गर्भवती महिलांसाठी पूरक आहार वितरण आणि मृद आरोग्य तपासणीसाठी माती परीक्षण करून आरोग्य कार्ड वितरण यामध्ये उल्लेखनीय प्रगती केली. भामरागड तालुक्याने यासोबतच स्वयंसहायता बचत गटांना खेळते भांडवल देण्यात १०० टक्के कार्यान्वयन करत ‘संपूर्णता’चा प्रत्यक्ष अनुभव निर्माण केला.

ही कामगिरी म्हणजे केवळ शासकीय टेबलावरील आकडेवारी नव्हे, तर ती एक प्रयत्नशील प्रशासन, प्रेरित यंत्रणा आणि जनभागीदारी यांची समन्वित फलश्रुती आहे. मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीने आता आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ‘संपूर्ण’पणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल इतर जिल्ह्यांसाठीही दिशादर्शक ठरणार आहे.