लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ९ जून – पोटेगाव-सावेला मार्गावर सोमवारी दुपारी चारच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांची नावे अनुराग रैजी मळवी (२८, रा. कसनसूर) आणि दिवाकर विठ्ठल उसेंडी (३२, रा. फुलबोडी) अशी आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग आणि दिवाकर हे एमएच ३३ / एएच ३०५० या क्रमांकाच्या दुचाकीने पोटेगाववरून गडचिरोलीच्या दिशेने जात होते. दरम्यान, गडचिरोलीवरून येणाऱ्या एमएच ३३ / टी-३६९३ क्रमांकाच्या कारने सावेला व मारोडा दरम्यान त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की दुचाकीचा पुढील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि दोघे तरुण जागीच ठार झाले.
अपघात होताच आसपासच्या गावातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गावच्या पोलिस पाटील सीमा मेश्राम यांना याबाबत माहिती दिली. मेश्राम यांनी तातडीने पोटेगाव पोलिस स्टेशनला कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
दरम्यान, नागरिकांनी प्रसंगावधान राखत संबंधित कारचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोटेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.