लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली ६ जून: नक्षल प्रभावाच्या सावटाखाली दीर्घ काळ विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या अजेंड्यावर अग्रक्रमावर आणल्याचे स्पष्ट केले. जिल्हा नियोजन भवन येथे शुक्रवारी पार पडलेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत त्यांनी शासनाच्या विविध विभागांना निर्देश दिले की, “गडचिरोली तुमच्या कार्यसूचीत कुठे आहे, यावर तुमची विकासदृष्टी ठरेल.”
या बैठकीत सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, खासदार नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वरिष्ठ वनाधिकारी आणि इतर संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्याची माहिती सादर केली.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्सून काळातील संभाव्य पूरस्थितीची सखोल माहिती घेतली. मध्यप्रदेशातून येणाऱ्या पाण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, जिल्हा आणि राज्य स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी अन्नधान्य, औषधे आणि गर्भवती महिलांच्या स्थलांतराच्या तयारीचा पुनरविचार करण्यासही त्यांनी सांगितले.
“गेल्या काही वर्षांत संपर्कविहीन गावांसाठी पाच टप्प्यांतील उपाययोजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यातील किमान दोन टप्पे यंदा पूर्ण होणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
वनक्षेत्रातील रस्ते आणि पूल प्रकल्पांचे काम सुरू असताना, वनविभागाने अनाठायी अडथळे निर्माण करू नयेत, अशी स्पष्ट सूचना देत त्यांनी वनअधिकाऱ्यांना लोकाभिमुखतेचा आग्रह धरावा, असा इशाराही दिला. “अधिकाऱ्यांकडून जर दहशतीची भावना निर्माण होत असेल, तर ती शासन खपवून घेणार नाही,” असे कठोर शब्दात त्यांनी बजावले.
गडचिरोली – रेल्वेमार्गाचं स्वप्न लवकरच प्रत्यक्षात?
वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाकडे लक्ष वेधत, मुख्यमंत्र्यांनी “ही प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण व्हावी” असे स्पष्ट आदेश दिले. “गडचिरोलीच्या प्रगतीसाठी जे प्रस्तावित प्रकल्प आहेत, त्याला आवश्यक निधी मी बजेटच्या माध्यमातून उपलब्ध करून देईन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना आश्वस्त करत सांगितले की, “गडचिरोलीचे विषय थेट माझ्यापर्यंत यावेत, म्हणूनच मी स्वतः पालकमंत्री म्हणून येथे कार्यरत आहे. सहपालकमंत्री जयस्वाल हे माझे पूर्ण अधिकार असलेले प्रतिनिधी आहेत. विकासाच्या प्रत्येक प्रस्तावाची नोंद घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल.”
या बैठकीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीक्षेत्र मार्कंडा या धार्मिक पर्यटनस्थळावर आधारित माहितीपटाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते केलेले प्रकाशन. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आणि त्यातून स्थानिकांना रोजगार संधी मिळवून देण्यासाठी ही एक महत्त्वाची पावले असल्याचे त्यांनी नमूद केले.
औद्योगिक सहकार्याची नवी दिशा..
बैठकीदरम्यान जिल्हा प्रशासन आणि खासगी उद्योग, स्वयंसेवी संस्थांमध्ये विविध विकासात्मक प्रकल्पांसाठी सामंजस्य करार सुद्धा करण्यात आले. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात नव्या औद्योगिक भागीदारीमुळे सामाजिक आणि आर्थिक पुनरुत्थानाची शक्यता वाढली आहे.या बैठकीचे सुत्रसंचालन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केले, तर आभार अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी मानले.