लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोलीच्या जंगलातून पुण्याच्या रंगमंचावर पोलीस दलाच्या श्वान नायिकेने उभारलेला हा विजय फक्त पदकापुरता मर्यादित नाही; तो ग्रामीण भागातील पोलीस दलातील प्रशिक्षण, चिकाटी आणि तांत्रिक प्रगल्भतेचा जिवंत पुरावा आहे. ‘सारा’च्या सुवर्णस्नानाने केवळ गडचिरोलीचाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाचा मान उंचावला आहे..
पुणे/ गडचिरोली दी,२३ : बदलत्या गुन्हेगारी तंत्रांना चकवणाऱ्या आणि शोधक क्षमतेची खरी ओळख दाखवणारी गडचिरोली पोलिसांची श्वान नायिका ‘सारा’ने 20व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात सुवर्णपदक पटकावत गडचिरोलीचं नाव संपूर्ण राज्यात दुमदुमवलं आहे. पुण्यात 15 ते 19 सप्टेंबरदरम्यान पार पडलेल्या या प्रतिष्ठित मेळाव्यात ‘गुन्हे शोधक’ प्रकारात साराने दाखवलेली नेमकी चपळाई, गंधज्ञान आणि अप्रतिम तपासकौशल्य पाहून परीक्षक थक्क झाले. राज्यातील 25 जिल्ह्यांतील पराक्रमी श्वानपथकांना मागे टाकत गडचिरोलीच्या या चारपायी वीरांगनेने सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
शहरांचा सतत वाढणारा विस्तार, बदलते गुन्हेगारी स्वरूप आणि वाढती आव्हाने यामध्ये पोलिसांना सज्ज, कुशल आणि अद्ययावत राहावे लागते. याच उद्देशाने राज्य गुन्हेअन्वेषण विभागाकडून गेल्या दोन दशकांपासून पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. विज्ञानाधारित तपास, फोटोग्राफी-व्हिडीओग्राफी, कम्प्युटर कौशल्य, अँटी सॅबोटाज तपासणी, तसेच श्वान पथक या विविध शाखांमध्ये लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. प्रत्येक स्पर्धेचे मूल्यमापन त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वस्तुनिष्ठ पद्धतीने केले जाते. या कसोशीच्या चाचण्यांतूनच खरी क्षमता सिद्ध होते.
गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील ‘सारा’ने या कसोटीवर शंभर टक्के उतरून सर्वोत्कृष्ट कामगिरी साकारली. तिच्या मार्गदर्शनासाठी श्वान पथकाचे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश बोरेवार तसेच समर्पित श्वान-हस्तक पोहवा राजेंद्र कौशिक आणि पोहवा अर्जुन परकीवार यांचे योगदान मोलाचे ठरले. त्यांच्या अथक प्रशिक्षणामुळे ‘सारा’ने केवळ सुवर्णपदकच पटकावले नाही, तर येत्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही मिळवली आहे.
या विजयानंतर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी संपूर्ण पथकाचा विशेष गौरव केला. “साराच्या नैसर्गिक गंधशक्तीला मिळालेल्या वैज्ञानिक प्रशिक्षणाची ही उत्तम फलश्रुती आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील पोलीस पथक राज्यस्तरावर उत्तुंग कामगिरी करत आहे, हे संपूर्ण विभागासाठी अभिमानास्पद आहे,” अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.