अतिदुर्गम भागातील २५ बेरोजगार तरुणांना गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने मिळाला रोजगार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २७ जानेवारी: गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींकरीता रोजगार अॅप तयार करण्यात आले असून, सदर ॲपच्या माध्यमातून गरजू युवक-युवती करीता रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी नागरिक कृती शाखा व प्रभारी अधिकारी मालेवाडा यांनी अथक परिश्रम घेऊन उपविभाग कुरखेडा अंतर्गत पोमकें मालेवाडा हद्दीतील २५ बेरोजगार युवकांना एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद येथे सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

आतापर्यंत २६३  युवकांना सुरक्षा रक्षक व १०५ युवतींना नर्सिंग असिस्टंट म्हणून रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले. तसेच ३५  युवतींना ब्युटी पार्लर प्रशिक्षण व ३०  युवकांना मत्स्यपालनाचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

रोजगार प्राप्त उमेदवारांचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले असून त्यांच्या उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशा.), अप्पर पोलीस अधीक्षक सौमय मुंडे अहेरी (प्राणहिता) तसेच एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद चे संचालक मल्लेश यादव उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी कुरखेडा, प्रभारी अधिकारी पोरकें मालेवाडा तसेच नागरी कृती शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Ankit GoyalMallesh YadavManish KalvaniyaSamir SheikhSoumay Munde