लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तांत्रिक कौशल्याचा प्रभावी वापर करत गडचिरोली पोलिस दलाच्या सायबर पोलिस ठाण्याने हरवलेले व चोरीला गेलेले तब्बल ₹१३.९७ लाख किमतीचे ९० मोबाईल फोन शोधून काढले असून, आज (११ नोव्हेंबर) हे मोबाईल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले.
या उपक्रमामुळे सायबर गुन्हे रोखण्यात गडचिरोली पोलिस दलाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. सन २०२५ मध्ये आतापर्यंत सायबर पोलिस ठाण्याने एकूण ₹३३.६४ लाख किमतीचे २१५ मोबाईल फोन त्यांच्या संबंधित मालकांना परत केले आहेत.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी नागरिकांना आवाहन केले की, “मोबाईल हरवला किंवा चोरी झाला असल्यास तात्काळ ceir.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी आणि जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच सायबर गुन्ह्यांबाबत सतर्क राहून कोणतीही फसवणूक झाल्यास १९३० किंवा १९४५ या क्रमांकावर त्वरित कळवावे.”
गडचिरोलीत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना, मोबाईल फोनचा शोध आणि त्याचे पुनर्वितरण ही केवळ तांत्रिक कामगिरी नव्हे तर जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणारी कृती ठरली आहे.
या कामगिरीत अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुळ राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अरुण फेगडे, मपोउपनि. नेहा हांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली.