गडचिरोली पोलिसांचा धाव- पूरग्रस्त भामरागडातून आरोग्य सेविकाचा एअर रेस्क्यू…

भामरागडातील आरोग्य सेविका हेलिकॉप्टरने वैद्यकीय स्थलांतर...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे कालपासून भामरागडसह तब्बल 112 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे. या दुर्गम परिस्थितीत मौजा आरेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका सीमा बांबोळे गंभीर आजाराने त्रस्त झाल्या. त्यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याने तात्काळ प्रगत उपचारांची आवश्यकता निर्माण झाली होती.

ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास येताच गडचिरोली पोलिस प्रशासनाने तातडीने हालचाल केली. पावसामुळे सर्व मार्ग बंद असल्याने रुग्णाला स्थलांतरित करण्यासाठी पवन हंस हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. पोलिसांच्या या वेगवान निर्णयामुळे आरेवाडा येथून सीमा बांबोळे यांना सुरक्षितपणे गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या जीव वाचवणाऱ्या मोहिमेत गडचिरोली पोलिसांचे हेलिकॉप्टर पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड, स्थानिक महसूल अधिकारी व कर्मचारी तसेच पवन हंसचे पायलट डीआयजी श्रीनिवास आणि सहपायलट आशिष पॉल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभाग यांच्यातील योग्य समन्वयामुळे दुर्गम भागातील आरोग्य सेविकेचा जीव वाचवता आला.

पूरामुळे वाहतूक व संपर्क तुटलेल्या परिस्थितीत जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने दाखविलेली ही तत्परता केवळ एका जीवाचे रक्षण नाही, तर संकटसमयी शासन यंत्रणा नागरिकांच्या सोबत उभी आहे याचेही प्रत्यंतर देणारी ठरली आहे.

 

gadchiroli policePolice help to medical staff