गडचिरोली पोलिसांच्या रक्तदानातून माणुसकीचा संदेश

प्रोजेक्ट उडान’मधून सामाजिक परिवर्तनाची उंच झेप ....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता, गडचिरोली पोलीस दलाने ‘प्रोजेक्ट उडान’च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा ठोस आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. पोलीस दादालोरा खिडकी या लोकाभिमुख उपक्रमाअंतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल १,२०३ रक्तदात्यांचा सहभाग नोंदवला गेला असून, यामध्ये आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा सहभाग हा या उपक्रमाचा सामाजिक आशय अधिक ठळक करणारा ठरला आहे.

 

दि. ०२ ते ०८ जानेवारीदरम्यान साजऱ्या करण्यात आलेल्या पोलीस रेझिंग डे सप्ताहात शस्त्र प्रदर्शन, स्वच्छता, व्यसनमुक्ती, रस्ता सुरक्षा, महिला सुरक्षा व सायबर जनजागृतीसारख्या उपक्रमांसोबतच रक्तदान शिबिराने मानवी मूल्यांचा केंद्रबिंदू अधोरेखित केला. पोलीस मुख्यालय गडचिरोली, उप-मुख्यालय प्राणहिता (अहेरी), उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरोंचा व पोलीस स्टेशन देसाईगंज येथे एकाचवेळी आयोजित शिबिरे हे जिल्हास्तरीय नियोजनाचे आणि प्रशासनिक समन्वयाचे उदाहरण ठरले.

विशेष म्हणजे, गडचिरोली पोलीस दलाने आतापर्यंत आयोजित केलेल्या पाच रक्तदान शिबिरांतून ४,३६१ रक्तदात्यांचे योगदान मिळाले असून, दुर्गम व संवेदनशील जिल्ह्यात पोलिसांची भूमिका केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरती मर्यादित नसून ती सामाजिक आरोग्य व्यवस्थेचीही मजबूत कडी बनत असल्याचे स्पष्ट होते.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी रक्तदान शिबिरादरम्यान केलेले आवाहन हे या उपक्रमाचे वैचारिक अधिष्ठान ठरले. “मानवी रक्ताला कोणताही पर्याय नाही; समाजाचे ऋण फेडण्याची ही संधी आहे,” असे सांगत त्यांनी पोलिसांसह नागरिकांनाही रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. रक्तदानातून एखाद्या अनोळखी रुग्णाचा जीव वाचू शकतो, ही भावना या शिबिरामागील प्रेरक शक्ती ठरली.

या उपक्रमात गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफ, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, नागरिकांसह ८ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा सहभाग हा विशेष लक्षवेधी ठरला. हिंसेच्या मार्गातून बाहेर पडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेल्या व्यक्तींचा रक्तदानातील सहभाग हा पुनर्वसन प्रक्रियेचा मानवी चेहरा अधोरेखित करणारा आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, उपजिल्हा रुग्णालय अहेरी, डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र नागपूर व शालीनीताई मेघे रक्तकेंद्र नागपूर यांच्या समन्वयातून रक्तसंकलनाची प्रक्रिया पार पडली. वैद्यकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन व सामाजिक संस्थांमधील हा समन्वय जिल्ह्याच्या आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

Gadchiroli police blood donation camp
Comments (0)
Add Comment