गडचिरोली पोलिसांचा ‘प्रोजेक्ट उडान’ – दुर्गम भागातील ३० युवक-युवतींना मत्स्यपालन प्रशिक्षणानंतर दिला यशाचा निरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, २३ जुलै : माओवादग्रस्त भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी गडचिरोली पोलिस दलाने सुरू केलेल्या ‘प्रोजेक्ट उडान’ या अभिनव उपक्रमाअंतर्गत मत्स्यपालन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच एकलव्य हॉल, पोलीस मुख्यालय येथे संपन्न झाला. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांतील ३० युवक-युवतींनी या उपक्रमात सहभागी होत मत्स्यपालनाचे दहा दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले.

गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात, बिओआय-आरसेटी गडचिरोली व पोलीस दादालोरा खिडकी या माध्यमातून आयोजित या उपक्रमात ग्रामीण युवकांना आधुनिक मत्स्यपालन व्यवसायाची संपूर्ण माहिती देण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रत्येक युवकाला प्रतीकात्मक स्वरूपात प्रत्येकी एक किलो मत्स्यबीज देण्यात आले, जे त्यांच्या भविष्यातील आर्थिक प्रवासाची सुरुवात ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या प्रेरणादायी संबोधनात त्यांनी सांगितले की, “आज दिले गेलेले बीज हे केवळ मत्स्यबीज नाही, तर उद्याच्या यशस्वी उद्योजकतेचे रोप आहे. शेतीच्या जोडीने मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, शेळीपालन यांसारखे पूरक व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देतील.”

आरसेटीचे समन्वयक हेमंत मेश्राम हे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, नागरी कृती शाखेचे पो.उपनि. चंद्रकांत शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

गडचिरोली पोलीस दलाच्या या उपक्रमामुळे केवळ पोलिसींगच नव्हे, तर ग्रामीण सक्षमीकरण आणि सामाजिक पुनर्रचना यासही एक नवा मार्ग मिळाला आहे. ‘प्रोजेक्ट उडान’द्वारे स्वावलंबनाच्या दिशेने उड्डाण घेणाऱ्या या युवकांचे पंख अधिक भक्कम होतील, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.