लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जागतिक नदी दिन विशेष लेख; गजानन जाधव, जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली.
गडचिरोली हे केवळ दाट जंगलं, जैवविविधता आणि आदिवासी परंपरांसाठीच नव्हे तर नद्यांच्या विस्तीर्ण जाळ्यासाठीही ओळखले जाते. या नद्या जिल्ह्याची माती सुपीक करतात, शेतीला पोषण देतात, मासेमारीला आधार देतात आणि स्थानिक संस्कृतीला जीवनदायी स्पंदन देतात. ‘नद्यांचा जिल्हा’ अशी ओळख मिळवलेल्या गडचिरोलीसाठी या जलस्रोतांचे महत्त्व अतूट आहे.
नद्यांचे अफाट जाळे…
गडचिरोली जिल्ह्यातील सती, खोब्रागडी, कठाणी, पोहार, दिना आणि प्राणहिता या नद्या इथल्याच डोंगरकड्यांतून उगम पावतात. वैनगंगा, वर्धा, इंद्रावती, गोदावरी, गाढवी, पर्लकोटा आणि पामुलगौतम या नद्या शेजारील राज्यांतून येत जिल्ह्यात मिसळतात. जिल्ह्याच्या उत्तरेकडून वैनगंगा, पश्चिमेकडून वर्धा, दक्षिणेकडून इंद्रावती आणि पूर्वेकडून गोदावरी अशा पाच प्रमुख नद्या गडचिरोलीला पाण्याचा अखंड शिरा पुरवतात.
वैनगंगा नदी चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे वर्धा नदीला मिळून प्राणहिता तयार करते, जी पुढे सिरोंच्याजवळ गोदावरीला मिळते. इंद्रावती नदी दक्षिण-पूर्व सीमेवरून वाहत जाऊन सोमनूर येथे गोदावरीला मिळते. या नद्यांना मिळणाऱ्या लहान उपनद्यांमुळे संपूर्ण जिल्हा जलसमृद्ध राहतो.
पवित्र संगम स्थळे…
गडचिरोलीतील नद्यांचे संगम धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्वाचे आहेत.
त्रिवेणी संगम, भामरागड – पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती या तीन नद्यांचा अद्भुत संगम.
सोमनूर त्रिवेणी संगम, सिरोंचा – इंद्रावती, गोदावरी आणि अंतरवाहिनीच्या संगमामुळे निसर्ग आणि अध्यात्म यांचा अनोखा मिलाफ.
वैनगंगा–वर्धा संगम, चपराळा – येथे वैनगंगा व वर्धा मिळून प्राणहिता तयार होते. या स्थळांना धार्मिक यात्रेचे तसेच निसर्ग पर्यटनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
जनजीवनाची जीवनरेखा…
नद्यांनी गडचिरोलीच्या समाजाला शेती, मासेमारी आणि सांस्कृतिक वारसा यासाठी भक्कम आधार दिला आहे. नदीकाठावरील सुपीक पट्ट्यांमध्ये भातशेती, भाजीपाला लागवड आणि पारंपरिक ‘मरियाण’ पद्धतीची शेती आजही मोठ्या प्रमाणावर केली जाते. ढिमर समाजासाठी या नद्या मासेमारीचे प्रमुख साधन आहेत. प्राचीन मंदिरे, घाट, आणि वैनगंगा नदीतील उत्तरवाहिनी तिर्थ यामुळे धार्मिक पर्यटनाला वेगळे स्थान मिळाले आहे.
जतन ही काळाची गरज…
औद्योगिक प्रगतीच्या वाटेवर असलेल्या गडचिरोलीसाठी या नद्यांचे महत्त्व भविष्यात अधिक वाढणार आहे. शेतीला पोषण, मासेमारीला रोजगार, जैवविविधतेला आसरा आणि संस्कृतीला आधार देणाऱ्या या नद्या जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीचा कणा आहेत.
त्यामुळे जलस्रोतांचे जतन, प्रदूषण नियंत्रण आणि संगम स्थळांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. नद्या जपल्या तर गडचिरोलीचे नैसर्गिक वैभव आणि स्थानिकांची समृद्धी कायम राहील, हा संदेशच जागतिक नदी दिन आपल्याला देतो…