लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली २२ : जिल्हा नियोजन विभागात गेल्या काही महिन्यांपासून वाढत चाललेल्या गोंधळ, तक्रारी आणि प्रशासकीय अव्यवस्थेला अखेर विराम मिळाला आहे. रुजू झाल्यापासूनच वादग्रस्त ठरलेले जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांची तातडीने बदली करण्यात आली असून, त्यांच्या ऐवजी नाशिकचे उपसंचालक (सांख्यिकी) प्रसाद घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामागे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट नोंदवलेली तक्रार निर्णायक ठरली, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
जिल्हा नियोजन विभागाच्या कारभाराबाबतचे वाद काही दिवसांपासून शिगेला पोहोचले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री असतानाही नियोजनातील भोंगळपणा, फाईल प्रक्रिया विलंब, मनमानी आणि अराजकतेमुळे लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि कंत्राटदार — तिघांच्याही नाराजीचा सूर वाढत होता. पाचखेडे यांच्या अलीकडच्या निर्णयांनी परिस्थिती अधिकच चिघळली.
काही दिवसांपूर्वीच माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी जिल्हा प्रशासनाकडे दोन पानांची विस्तृत तक्रार दाखल करून पाचखेडेंच्या कथित गैरव्यवहारांचा तपशीलवार उल्लेख केला होता. अश्लील शिवीगाळ, कर्मचाऱ्यांवरील अमानुष वक्तव्ये,वाहन चालकाला कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकणे, कामात विलंब, सर्वसाधारण नागरिकांशी उद्धट वर्तन — अशा एकापेक्षा एक गंभीर आरोपांची मालिका प्रशासनासमोर आली होती.
यात भर म्हणून काही कंत्राटदारांनी पाचखेडेंनी स्वतःच्या पत्नीच्या बँक खात्यातून पैसे स्वीकारल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांना पुरावे सादर केले. २४ मार्च रोजी बँक व्यवहाराचा तपशील प्रशासनासमोर उघड पडताच पाचखेडे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली. जिल्हा नियोजन विभागात निर्माण झालेल्या गोंधळाचे स्वरूप इतके वाढले की तातडीच्या कारवाईची मागणी होत होती.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट हस्तक्षेपाची मागणी करत पाचखेडे यांच्या कारभाराबाबत तपशीलवार माहिती सादर केली. त्यानंतर अल्पावधीतच पाचखेडे यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांना मुंबई येथील अर्थ व सांख्यिकी संचालनालयात हलविण्यात आले आहे.
गडचिरोलीच्या जिल्हा नियोजन कार्यालयाचा हा वाद नवीन नाही. यापूर्वीही पाचखेडेंच्या पूर्वसूरी खडतकर यांनाही वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे पद सोडावे लागले होते. त्यामुळे या विभागातील प्रशासनिक संस्कृती, जबाबदारी आणि पारदर्शकता यांच्यावर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाचखेडे यांच्या बदलीनंतर जिल्हा नियोजन विभागात काही प्रमाणात दिलासा व्यक्त होत असला तरी फक्त अधिकारी बदलून काय बदलणार? व्यवस्थेतील दोष दूर होतील का? हा प्रश्न स्थानिकांमध्ये चर्चेत आहे.