“महास्ट्राइड” परिषदेत गडचिरोलीचा विकास आराखडा ठसठशीतपणे मांडला

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयआयएम नागपूर येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे सादरीकरण; गडचिरोलीच्या 'स्टील नगरी'कडे वाटचालीस गती..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, २९ जून : राज्य शासनाच्या ‘मित्र’ (Mission for Transformation of Rural Districts) संस्थेच्या पुढाकाराने आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने नागपूर येथील आयआयएममध्ये पार पडलेल्या दोन दिवसीय ‘महास्ट्राइड’ परिषदेत गडचिरोली जिल्ह्याचा समावेश असलेला विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वर्ल्ड बँकेच्या प्रतिनिधींसमोर प्रभावीपणे सादर करण्यात आला. हे सादरीकरण जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

“नव्या दृष्टीकोनातून गडचिरोली – आकांक्षांपासून कृतीकडे” या भूमिकेतून केलेल्या सादरीकरणात जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक बदलांची रूपरेषा सादर झाली. विशेषतः सध्या ₹१०,९२१ कोटी असलेले जिल्ह्याचे वार्षिक उत्पन्न २०२८ पर्यंत ₹२७,३०३ कोटींवर नेण्याचे लक्ष्य, तर प्रति व्यक्ती उत्पन्न ₹१.४० लाखांवरून ₹२.८० लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्धार या आराखड्यात नमूद आहे.

या सादरीकरणात ‘स्टील नगरी’कडे वाटचाल, सेंद्रिय शेती व वनउपज प्रक्रियायंत्रणा, पर्यटन विकास, बँकिंग आणि सामाजिक सुरक्षा सेवा विस्तार, जलसंपदा व्यवस्थापन, मत्स्य व्यवसाय, आणि जीआयएस आधारित अंमलबजावणी प्रणाली अशा विविध क्षेत्रांतील भरीव संकल्पनांची मांडणी झाली.

नागपूर विभागातून महास्ट्राइडसाठी गडचिरोली हा एकमेव निवडलेला जिल्हा होता. पंडा यांच्यासह वाशिम, धाराशिव, जळगाव, ठाणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही आपापले विकास आराखडे सादर केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महास्ट्राइड उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण जिल्ह्यांच्या विकासाला नवा वेग देण्याची गरज अधोरेखित करताना, “राज्य शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल,” अशी ग्वाही दिली.

या परिषदेला गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, ‘मित्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, राजेश क्षीरसागर, राणा जगजीतसिंह पाटील, अपर मुख्य सचिव राजेश मीना, राजगोपाल देवरा, तसेच वर्ल्ड बँकेचे प्रतिनिधी मारचीन पियाटकोस्की उपस्थित होते.

GadchiroliGadchiroli devlopment projectGadchiroli steel hubSteel city gadchiroli