लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याने केंद्र शासनाच्या आकांक्षित जिल्हा अभियानात उल्लेखनीय प्रगती साधत ‘संपूर्णतः’ उपक्रमात राज्यभरात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध विभागांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि यंत्रणांचा गौरव करण्यासाठी सुमानंद सभागृहात भव्य सन्मान सोहळा संपन्न झाला.
नीती आयोगाच्या ‘संपूर्णतः अभियान’ अंतर्गत १०० टक्के संपृक्तता गाठणाऱ्या यंत्रणांचा गौरव करताना जिल्हा प्रशासनाच्या झपाट्याने केलेल्या कामकाजाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली.
कार्यक्रमास आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, आमदार डॉ. मिलींद नरोटे, माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी खासदार डॉ. अशोक नेते, नागपूरच्या आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्त आयुषी सिंह, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, तसेच तीन्ही प्रकल्प अधिकारी प्रमुख उपस्थित होते.
अहेरी, भामरागडच्या यंत्रणांना ‘कास्य’ व ‘ताम्र’ सन्मान…
‘संपूर्णतः’ मोहिमेअंतर्गत अहेरी तालुक्याने ६ पैकी ४, तर भामरागडने ६ पैकी ३ निर्देशांकांमध्ये १०० टक्के संपृक्तता साध्य केली. या कामगिरीसाठी अहेरीच्या गटविकास अधिकाऱ्यांना ‘कास्य’ आणि भामरागडच्या अधिकाऱ्यांना ‘ताम्र’ पदक प्रदान करण्यात आले. हा सन्मान डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते देण्यात आला.
शिक्षण, आरोग्य आणि नियोजन विभागांची भक्कम साथ….
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी, एएनएम, आशा सेविका, तसेच अंगणवाडी सेविका, कृषी अधिकारी व सहाय्यक, आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याही कार्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
गावपातळीवरील कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळेच ‘संपूर्णतः’ अभियानाला प्रत्यक्ष परिणामकारकता मिळाली, हे यावेळी अनेक मान्यवरांनी अधोरेखित केले.
‘आकांक्षा हाट’चे भव्य उद्घाटन — स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ….
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘वोकल फॉर लोकल’ संकल्पनेला चालना देण्यासाठी ‘आकांक्षा हाट’ या विशेष स्टॉल उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ. उईके आणि आमदार डॉ. नरोटे यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटनात अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, आरमोरी, धानोरा व कुरखेडा येथील बचत गटांनी भाग घेतला.
महिलांनी सादर केलेल्या उत्पादनांमध्ये लाकडी व बांबूपासून तयार वस्तू, रानभाज्या, मोहा-नाचणी लाडू, मसाले, सॅनिटरी पॅड, लोणचं यांचा समावेश होता.
या स्टॉल्सना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर प्रशासनाने या उत्पादनांना बाजारपेठ देण्यासाठी तत्परता दाखवली.
‘संपूर्णतः’चा अर्थ — संपूर्णतेने सर्वांपर्यंत!…
नीती आयोगाच्या संकल्पनेनुसार, संपूर्णतः अभियान म्हणजे केवळ निर्देशांक पूर्ण करणे नव्हे, तर जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवणे. गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि भौगोलिकदृष्ट्या अवघड जिल्ह्यात ही साधलेली प्रगती लोकशाही यंत्रणांच्या कणखर इच्छाशक्तीचे प्रतीक ठरते.