गडचिरोलीची ‘स्टील हब’च्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल

नैसर्गिक संपत्तीचा विनाश न करता विकास साधण्यास प्राधान्य; गडचिरोली राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनेल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्ह्याची ‘स्टील हब’च्या दिशेने भक्कम वाटचाल सुरू असून, स्थानिक जीवनमानात लोह उद्योग प्रकल्पातून मोठा बदल घडत आहे. जल, जंगल आणि जमीन या नैसर्गिक संपत्तीचा विनाश न करता पर्यावरणस्नेही औद्योगिक विकास साधण्याच्या धोरणावर राज्य सरकार ठाम असून, पुढील काही वर्षांत दरडोई उत्पन्न वाढवून गडचिरोली राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोनसरी येथे व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेडच्या विविध औद्योगिक आणि सामाजिक प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन पार पडले. यात हेडरी येथील ५ दशलक्ष टन क्षमतेचा आयर्न ओर ग्राइंडिंग प्लांट, हेडरी-कोनसरी दरम्यानची ८५ किमी लांबीची १० दशलक्ष टन क्षमतेची स्लरी पाइपलाइन, कोनसरी येथील ४ दशलक्ष टन पेलेट प्रकल्प, प्रस्तावित ४.५ दशलक्ष टन क्षमतेचा स्टील प्लांट, १०० खाटांचे रुग्णालय, सीबीएसई शाळा, तसेच सोमनपल्ली येथील कर्मचारी वसाहतीचा समावेश होता. हे प्रकल्प गडचिरोलीला ‘स्टील हब ऑफ इंडिया’ बनविण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

२०१६ पासून अनेक अडथळ्यांवर मात करून लोह उत्खनन सुरू झाले असून, आतापर्यंत १४ हजार स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. हाऊसकीपिंगपासून एलएनजी ट्रॅक्स चालकांपर्यंत महिलांनीही यात मोठा वाटा उचलल्याचे उदाहरण मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्ह्याच्या विकासासाठी फक्त उत्खनन नव्हे, तर येथेच प्रक्रिया आणि उत्पादन व्हावे, रोजगार इथल्या युवकांना मिळावा, यासाठी शासनाने ठोस अटी घालूनच परवाने दिल्याची माहिती त्यांनी दिली.

८० किमी लांबीची स्लरी पाइपलाइन पर्यावरणपूरक असून, ती ५५ टक्के कार्बन उत्सर्जन घटवणार आहे. राज्यातील पहिली, तर देशातील चौथी स्लरी पाइपलाइन म्हणून या यंत्रणेचे विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय ग्रीन ट्रान्सपोर्टेशनसाठी ई-वाहन आणि गॅसवर आधारित वाहतूक वाढवण्याची दिशा दाखवली असून, पुढील दोन वर्षांत एक कोटी झाडांची लागवड करून गडचिरोलीचे हरित क्षेत्रही वाढवले जाणार आहे.

शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रातही स्थानिकांना सशक्त करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, पाच लाखांपर्यंतचा मोफत उपचार शासन देत आहे. यामुळे नागरिकांना उपचारासाठी गडचिरोलीबाहेर जावे लागणार नाही.

गडचिरोलीतील माओवादाच्या छायेमधून बाहेर येऊन जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होत असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी उर्वरित माओवादींना शस्त्र सोडून समाजाच्या प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले. शहरी माओवाद आणि बाहेरून अफवा पसरवणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. आदिवासींच्या जमिनी हिसकावल्या जात आहेत, मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे, अशा अपप्रचाराचा खंडन करत, विकास हीच खरी ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोलीप्रती असलेल्या आत्मीयतेचा उल्लेख करत, वाढदिवसाच्या दिवशी हजारो लोकांना भेटण्याऐवजी गडचिरोलीत उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्र्यांच्या ‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेचा धागा पकडत, गडचिरोलीही या विकासाच्या प्रवाहात बळकटपणे उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी प्रास्ताविक करताना कंपनीच्या सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली. कार्यक्रमास अनेक मान्यवर, अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गडचिरोलीच्या औद्योगिक इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा ठरला.

Gadchiroli steel hubKonsari steel plantWorld best steel