लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि,०२: स्थानिक तरुणांच्या करिअर आकांक्षांना कोणताही अडथळा येऊ नये, या व्यापक सामाजिक जाणिवेतून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) यांनी यंदाच्या वर्षासाठी प्रस्तावित ‘गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीग’ (GDPL) स्पर्धा स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ एका क्रीडा स्पर्धेपुरता मर्यादित न राहता, समाजहिताला अग्रक्रम देणाऱ्या जबाबदार विचारसरणीचे प्रतीक ठरत आहे.
आगामी पोलीस भरती प्रक्रियेच्या तयारीसाठी जिल्ह्यातील शेकडो युवक याच मैदानावर नियमित व सातत्यपूर्ण सराव करीत आहेत. या पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या आयोजनामुळे त्यांच्या शारीरिक तयारीत अडथळा निर्माण होऊन करिअरच्या संधी बाधित होऊ शकतात, ही बाब लक्षात घेत कंपनीने स्वेच्छेने पाऊल मागे घेत समाजहिताचा मार्ग स्वीकारला.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना LMEL चे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी सांगितले की, GDPL च्या माध्यमातून गडचिरोलीला राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा अनुभव देण्याची कंपनीची ठाम इच्छा होती. मात्र,
“स्थानिक तरुणांचे भविष्य, त्यांची नोकरीची स्वप्ने आणि त्यासाठीची कठोर मेहनत यापेक्षा कोणताही सोहळा मोठा नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक परवानग्या यापूर्वीच प्राप्त झालेल्या होत्या. पायाभूत सुविधा, नियोजन तसेच नामांकित व्यक्तींच्या सहभागासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही करण्यात आली होती. तरीही, संभाव्य आर्थिक नुकसान स्वीकारून दीर्घकालीन सामाजिक हिताला प्राधान्य देण्याचा निर्णय कंपनीने घेतला, ही बाब उल्लेखनीय ठरते.
GDPL स्पर्धा यंदा स्थगित असली, तरी गडचिरोलीतील क्रीडा विकास, युवक सक्षमीकरण आणि सामाजिक उपक्रमांसाठी लॉयड्स कंपनीची वचनबद्धता कायम राहील, असा पुनरुच्चार व्यवस्थापनाने केला आहे. तसेच, पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.