लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
कोरची, दि. १६ नोव्हेंबर: तालुक्यातील बेतकाठी येथे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरी करण्यास आलेल्या चार चोरांना शेळी चोरताना पाहून गावकऱ्यांनी चांगला चोप दिला. गावकऱ्यांच्या काठीचे प्रहार बसताच चोर बोकडाला सोडून पळून गेले. त्यापैकी दोन चोरांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतु कोरची पोलिसांनी दोन्ही गुंडांना सोडून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
बेतकाठी येथील कृष्णा गुरुभेलिया या शेतकऱ्यांच्या घरी १३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री शेळी गोठ्यातून शेळ्यांचा आवाज आल्यानंतर त्यांनी जागे होऊन पाहिले असता चार संशयित हालचाली करताना दिसले. त्या चोरांपैकी एक चोर १५ हजार रुपये किंमतीचा भला मोठा बोकड उचलून नेत होता. कृष्णा गुरुभेलिया यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्या चोराने त्यांच्यावर काठीने प्रहार केला. तो प्रहार हुसकावून आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून कुटुंबातील इतर सदस्य व शेजारी राहणारे लोक जागे झाले. त्यांची चारही चोरांवर धावा केला. गावकऱ्यांचा मार खावून पळताना गावकऱ्यांनी दोघांना पकडले.
दोन चोरांना पकडून रात्रभर जागून काढली. त्यानंतर गावकरी स्थानिक पोलीस पाटील यांनी गाव वर्गणी करून किरायाने केलेल्या वाहनाने कोरची पोलिस ठाण्यात पोहोचविले. या दोन्ही कुख्यात गुंडांना अटक करून उर्वरित दोघांचाही शोध घेऊ, असे आश्वासन दिल्यावर गावकरी बेतकाठीला परतले. कोरची पोलीसांनी या पकडुन आणलेल्या कुख्यात गुंडांवर गुन्हा दाखल न करताच परस्पर सोडून दिले. त्याची माहिती बेतकाठी गावात आज १६ नोव्हेंबरला पोहोचली. त्यामुळे गावकऱ्यांनी पोलिसांबाबत संताप व्यक्त केला.
तक्रारदार पोलीस स्टेशन मध्ये आले नव्हते. बेतकाठी येथील पोलीस पाटील यांनी दोन संबंधित व्यक्तींना घेऊन आले. त्यावेळी ताब्यात घेतलेल्या लोकांकडून चौकशी केले असता चोरी झाली नसल्याचे स्पष्ट होताच त्यांना चौकशीअंती सोडण्यात आले.
विनोद गोडबोले,सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलीस ठाणे, कोरची.