हळदीला सोन्याचा भाव..! ३१ हजार रुपये मिळाला उच्चांकी दर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, स्पेशल रिपोर्ट

प्रतिनिधी – सचिन कांबळे

सांगली, दि. ८ मार्च: स्थानिक हळदीची आवक वाढत आहे आणि हळदीला आता उच्चांकी दर मिळू लागलेले आहेत. आष्टा या ठिकाणी बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या हळदीच्या सौद्यात हळदीला सर्वाधिक उच्चांक असा ३१ हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.

जागतिक हळदीची बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे. सांगलीच्या मार्केट यार्ड मध्ये देशातल्या अनेक राज्यातून हळद विक्रीसाठी दाखल होत असते. त्याचबरोबर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात हळदीचे पीक घेतल्या जाते. यामध्ये राजापुरी हळदीचे पीक हे प्रसिद्ध आहे. वाळवा तालुक्यात हळदीचा मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.  त्यामुळे सांगलीच्या मार्केट यार्ड बरोबर इस्लामपूर बाजार समितीचे उपबाजार असणाऱ्या आष्टा येथील विलासराव शिंदे हळद मार्केट याठिकाणी हळदीचे सौदे पार पडतात. शनिवारी या बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या सौद्यात हळदीला उच्चांकी असा दर मिळाला आहे.  

तब्बल ३१  हजार रुपये इतका दर राजापुरी हळदीला मिळाला आहे. मिरजवाडी येथील बिपिन खोत या शेतकरयाच्या हळदीला हा उच्चांकी दर मिळाला आहे. या सौदयात सुमारे २ हजार १००  पोत्यांची आवक झाली होती आणि सर्वाधिक दर यंदा मिळाला आहे. अशी माहिती इस्लामपूर कृषी बाजार समितीचे सभापती अल्लाऊद्दीन चौगुले यांनी सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या बाजारपेठेत हळदीला उच्चांकी दर मिळात आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या हळदीला ३० हजार क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला होता. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.