गोंडी शाळेचा लंडनशी संवाद : मोहगावच्या विद्यार्थ्यांची स्वप्नांना आंतरराष्ट्रीय दिशा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : मातृभाषा, आदिवासी अस्मिता आणि एक्स नवप्रेरणा यांचा संगम साधणाऱ्या मोहगाव गोंडी शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकतीच एक अद्वितीय शैक्षणिक यात्रा अनुभवली — तीही प्रत्यक्ष लंडनला गेले नसतानाही. ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी लंडनमधील ऐतिहासिक आणि जागतिक ख्यातीच्या शैक्षणिक संस्था प्रत्यक्ष पाहिल्या, तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि उच्च शिक्षणाबाबत नवे क्षितिज उघडले.

या लंडन ऑनलाईन शिक्षणभ्रमंतीत विद्यार्थ्यांनी किंग्स क्रॉस स्टेशन, ब्रिटिश लायब्ररी, लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन, बेर्कबेक विद्यापीठ, सोस विद्यापीठ आणि सिनेट हाऊस लायब्ररी यांसारख्या संस्थांना भेट दिली. यामागचा उद्देश विद्यार्थ्यांच्या मनात बालवयातच मोठी स्वप्नं पेरणे, मातृभाषेतील शिक्षणासोबतच जागतिक आकाशाच्या ओळखी करून देणे हा होता.

या उपक्रमात लंडनस्थित अ‍ॅड. बोधी रामटेके यांचे मोलाचे योगदान लाभले. युरोपातील विविध विद्यापीठांत कायद्याचे शिक्षण घेत असलेले आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर कार्यरत असलेले रामटेके यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणातील संधी, विद्यापीठीय जीवनशैली आणि शिष्यवृत्ती याबाबत समर्पक मार्गदर्शन केले. त्यांचा जीवनप्रवासही या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरला.

मोहगाव ग्रामसभेद्वारे चालवली जाणारी ही गोंडी शाळा गेल्या सहा वर्षांपासून गोंडी व इंग्रजी या दुहेरी भाषांतून शिक्षण देत असून, ती आदिवासी समाजातील सांस्कृतिक पुनरुज्जीवन व शैक्षणिक नवचैतन्याचं प्रतीक ठरली आहे. मात्र, संविधानिक मुल्यांशी सुसंगत असूनही या शाळेला अद्याप शासकीय मान्यता लाभलेली नाही, ही बाब चिंता आणि संघर्षाचा विषय ठरत आहे.

शाळेचे समर्पित शिक्षक शेषराव गावडे यांनी या उपक्रमामागील दृष्टी स्पष्ट करताना सांगितले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना जागतिक पातळीवर विचार करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आम्ही असे अनेक उपक्रम राबवत आहोत. शिक्षण हे केवळ प्रमाणपत्र मिळवण्याचे साधन नसून, त्यातून जग बदलण्याची दृष्टी मिळावी, यासाठीच हा प्रयत्न आहे.”

या यशस्वी उपक्रमात गावडे यांच्यासह अविनाश श्रीरामे, ग्रामसभेचे देवसाय आतला, बावसू पावे आणि स्थानिक कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग घेतला. आदिवासी भाषिक शाळांमध्ये अशा प्रकारचा जागतिक संवादाचा उपक्रम हे एक दुर्लभ उदाहरण ठरते.

गोंडी भाषेतील मुलांना लंडनच्या ज्ञानदालनांशी जोडणारा हा प्रयत्न केवळ तात्कालिक उपक्रम न राहता, एका नव्या शिक्षणदृष्टीच्या प्रारंभाचा घोष ठरत आहे. गडचिरोलीच्या जंगलांतील लहानशा गावातून सुरू झालेला हा आवाज आता लंडनच्या भिंतींना ही ऐकू येत आहे – आणि तेही त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेत असल्याने कौतुकाचा वर्षाव होत आहे.