लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद, नवी दिल्ली व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीय इतिहास लेखन : मध्य प्रांतातील जनजातीय योगदान” या विषयावर दोन दिवसीय जनजातीय गौरव राष्ट्रीय परिसंवादाचे यशस्वी आयोजन इंग्रजी विभाग व आदिवासी अध्यासन केंद्राद्वारे करण्यात आले. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या जनजातीय गौरव वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या परिसंवादात विविध संशोधक, प्राध्यापक व अभ्यासकांनी सहभाग नोंदवला. भारतीय इतिहासाच्या लेखनामध्ये जनजातीय समाजाचे योगदान विशेषतः मध्य भारतातील प्रदेश – छत्तीसगड, मध्यप्रदेश, विदर्भ, तेलंगाना आणि झारखंड येथील जनजातीय समुदायाच्या ऐतिहासिक क्रांतीचा इतिहास यावर विविध चर्चासत्राच्या माध्यमातून जनजातीय समाजाच्या ऐतिहासिक योगदानाचा विविध अंगांनी मागोवा घेण्यात आला.
दुसऱ्या दिवसीय सत्रात जनजातीय नायक बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके,राणी दुर्गावती, राणी हिराई यांचे योगदान, मध्य प्रांतातील जनजातीय योगदान, जनजातीय धार्मिक व पारंपारिक जीवन पद्धती, साहित्य, कायदे, लोकगीत व भाषा या विविध विषयवार संशोधक व प्राध्यापकानी शोधनिबंधाचे सादरीकरण करण्यात आले. आदिवासी अध्यासन केंद्राद्वारे गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यातील गोंड, माडिया, कोलाम जनजातीय दस्तऐवजीकरण करिता कार्य करणारे संशोधकांनी त्यांच्या संशोधनाचे सादरीकरण इतिहास विभागाचे विभाग प्रमुख, डॉ. नंदकिशोर मने व अभिसभा सदस्य डॉ.नरेश मडावी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले.
कलिंगा सामाजिक विज्ञान संस्था, भुवनेश्वर येथील अधिष्ठाता डॉ. चित्तरंजन भोई यांनी बिरसा मुंडांचा वारसा व नव्या भारताची प्रेरणा या सत्रात बिरसा मुंडाच्या उलगुलान चे भारतीय इतिहास वरील प्रभाव वर मार्गदर्शन केले व डॉ. देवाजी तोफा यांनी आदिवासी गोटूल शिक्षण पद्धती व पारंपारिक मुल्य जतन परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.
सत्राध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.विवेक गोर्लावार यांनी परिषदेच्या माधमातून जनजातीय इतिहास संशोधनात्मक लेखनास चालना मिळण्यास व जनजातीय गौरवशाली इतिहास जनजागृतीस महत्वाचे योगदान देणार आहे व अभिसभा सदस्य डॉ. रुपेन्द्र्कुमार गौर यांनी जनजातीय संस्कृतीत भारतीय संविधानातील कर्तव्ये व जबाबदाऱ्या पूर्वापार पाळल्या जात असल्याचे नमुद केले.
समारोपीय सत्राध्यक्ष डॉ. नंदकिशोर मने यांनी आदिवासी मौखिक परंपरा व गोटूल शिक्षणपद्धतीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत, या मौल्यवान परंपरांचे दस्तऐवजीकरण आणि अभ्यास इतिहास लेखनात संशोधकांनी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात इंग्रजी विभागाद्वारे प्रकाशित माहिती पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
परिषदेचे समन्वयक डॉ. वैभव मसराम यांनी सुत्रसंचालन केले तर विभागप्रमुख प्रा. विवेक जोशी यांनी आभारप्रदर्शन केले. या समारोप सत्रासाठी अधिष्ठाता डॉ. शाम खंडारे, ज्ञान स्त्रोत केंद्राच्या संचालक डॉ. रजनी वाढई, व्यवस्थापन व अधिसभा सदस्य प्रमुख उपस्थित होते. परिसंवादाच्या यशस्वी आयोजनामध्ये डॉ. शिल्पा आठवले, डॉ. प्रमोद जावरे, डॉ. अतुल गावस्कर यांचे विशेष सहकार्य लाभले, तसेच सहभागी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवून परिसंवाद अधिक प्रभावी केला.