राज्याच्या शैक्षणिक दिशानिर्देशनात गोंडवाना विद्यापीठाचा ठसा

प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे महासार्कच्या सदस्यपदी नियुक्ती...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली दि,०३: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्थेत सहकार्य, समन्वय आणि नवोपक्रमाची संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (महासार्क) या अत्यंत महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय समितीवर गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केवळ गोंडवाना विद्यापीठासाठीच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

महासार्क समितीतील काही पदे रिक्त झाल्याने राज्य शासनाने अध्यादेश काढत राज्यातील दोन प्र-कुलगुरूंची या समितीवर नियुक्ती जाहीर केली असून, त्यामध्ये डॉ. कावळे यांचा समावेश करण्यात आला आहे. दुर्गम, आदिवासी आणि सीमावर्ती भागातून आलेल्या विद्यापीठाला राज्याच्या शैक्षणिक धोरणनिर्मितीच्या केंद्रस्थानी नेणारी ही नियुक्ती म्हणून तिचे विशेष महत्त्व अधोरेखित होत आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने उच्च शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि गुणवत्ताधिष्ठित शैक्षणिक विकास अधिक सुदृढ करणे, तसेच त्याला पुढील स्तरावर नेणे हा महासार्क स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे. यासाठी राष्ट्रीय व जागतिक पातळीवरील शैक्षणिक संकल्पना, विचारप्रवाह, तर्कशास्त्रीय मांडणी, संशोधन पद्धती आणि शैक्षणिक नवकल्पना यांची व्यापक देवाण-घेवाण घडवून आणत, राज्याच्या शिक्षण धोरणांना दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महासार्कमार्फत केले जाणार आहे.

डॉ. श्रीराम कावळे हे शैक्षणिक प्रशासन, धोरणात्मक नियोजन, संशोधनाभिमुख दृष्टिकोन आणि गुणवत्ताधारित उच्च शिक्षण विकास या क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या महासार्कमधील सक्रिय सहभागामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक योगदानाला राज्यस्तरीय व्यासपीठ मिळणार असून, विशेषतः आदिवासी, दुर्गम व वंचित भागातील उच्च शिक्षणासमोरील प्रश्न, आव्हाने आणि संधी प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या संशोधनपर परंपरेला, नवोपक्रमांना आणि सामाजिक बांधिलकीला नवी दिशा मिळेल, तसेच राज्याच्या शैक्षणिक धोरणात गोंडवाना विद्यापीठाचा ठोस आणि परिणामकारक आवाज उमटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या सन्माननीय नियुक्तीबद्दल कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थीवर्गात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून डॉ. श्रीराम कावळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

gondwana university
Comments (0)
Add Comment