लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्राने (STRC) गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामस्तरावर नवा तंत्रज्ञान उपक्रम सुरू केलाय. या साठी राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान–भारत (NIF) यांच्यासोबत महत्त्वाची भागीदारी करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गावातील युवक, शेतकरी आणि महिलांना नवे तंत्रज्ञान वापरून रोजगार व उद्योग करण्याची संधी मिळणार आहे.
यापूर्वी विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्रातर्फे संशोधन सहयोगी डॉ. राहुल प्रकाश यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान–भारत (NIF) यांच्या सोबत ग्रामीण नवोन्मेष व इंटर्नशिपबाबत मार्गदर्शन सत्र झाले होते. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यासाठी निवडक तंत्रज्ञान मिळवण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्राने राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान–भारत यांना प्रस्ताव पाठवला. प्रस्ताव NIF च्या संशोधन सल्लागार समितीने (RAC) मंजूर केला असून, विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्र व राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान–भारत यांच्यातील अटी व करारनाम्यावर स्वाक्षऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी लाभार्थ्यांची निवड देखील करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत STRC ला ही यंत्रे मिळाली आहेत:
कापूस वात तयार करणारे हातचालित यंत्र
मका सोलण्याचे यंत्र
पत्रावळ आणि वाटी बनवणारे यंत्र (सिंगल व डबल डाय)
मसाले दळण्याचे मल्टी स्पाइस ग्राइंडर
झाडावर चढण्यासाठी मल्टी ट्री क्लायंबर
बांबू पट्टी व अगरबत्ती बनविण्याचे यंत्र
बहुउद्देशीय अन्न प्रक्रिया यंत्र (टँक क्षमता ९० लिटर)
या यंत्रांचा वापर कसा करायचा यासाठी STRC कडून लवकरच प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम घेतला जाणार आहे आणि नंतर ही यंत्रे स्थानिक लाभार्थ्यांना देण्यात येतील.
या प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यात गावपातळीवर नवे उद्योग, रोजगार आणि स्वावलंबनाला मदत होणार असून, ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र – कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्या मार्गदर्शनाने गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे .
या उपक्रमामुळे होणारे फायदे
रोजगार निर्मिती व महिला सक्षमीकरण,
लघुउद्योग/स्वयंरोजगार संधी,
शेती उत्पादकतेस पूरक व्यवसाय
खर्च व वेळेची बचत,
स्थानिक पातळीवर गुणवत्तापूर्ण उत्पादन,
गाव स्तरावर उद्योग विकास व गावातील उत्पन्न वाढ.