लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
लाडकी बहीण योजना : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता कधी मिळणार याकडे राज्यातील महिलांचं लक्ष लागलेलं असताना हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहीण योजनेची रक्कम बहिणींच्या खात्यात वर्ग केली जाईल असं म्हटलं होतं.त्यानुसार, याच वर्षी लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हफ्ता मिळणार आहे. हा हफ्ता देण्याची प्रक्रीया आजपासून सुरु झाली असून विधानसभा निवडणुकांच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रीया आजपासून पुन्हा सुरु झाल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. X माध्यमावर याविषयी त्यांनी ही माहिती दिली.
‘महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ( @Dev_Fadnavis) , उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे (@mieknathshinde) आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (@AjitPawarSpeaks) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.’
डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे.