शासकीय कर्मचाऱ्यांना घालावे लागणार दर शुक्रवारी खादीचे कपडे

  • शासन निर्णय निर्गमित
  • खादीला चालना देण्याचा उद्देश

अमरावती, 25 डिसेंबर: खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय आधिकारी व कर्मचार्‍यांनी आठवड्यातून किमान एकदा, म्हणजेच दर शुक्रवारी खादीचे कपडे परिधान करावे, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. तसे पत्रही सर्व कार्यालयांना पाठविण्यात आले आहे.

तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत अमरावती जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून विकेंद्रित सोलर चरखा समूह कार्यक्रम हा नावीन्यपूर्ण पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील 21 गावात 250 महिलांना सोलर चरखे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. कस्तुरबा सोलर खादी महिला समितीमार्फत अमरावती जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी करुन त्यापासून चरख्यासाठी लागणारा कच्चा माल तयार करण्यात येतो. विविध गावातील चरख्यावर सूत कताई करून त्यापासून सौर खादी कापड व विविध सौर खादी उत्पादनांची निर्मिती केली जाते. संपूर्णतः महिलांकडून महिलांसाठी राबविण्यात येणारा हा देशातील पहिला व एकमेव प्रकल्प आहे. या प्रकल्पा अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील 300 पेक्षा महिलांना रोजगार प्राप्त झाला असून हा प्रकल्प पूर्णतः सामाजिक भावनेतून ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर राबविण्यात येतो.

या प्रकल्पा अंतर्गत राज्य शासन उद्योग विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रमांतर्गत अमरावती एम.आय.डी.सी. येथे ग्रीन फॅब सोलर खादी प्रोसेसिंग क्लस्टर या नावाने सामूहिक सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या सामूहिक सुविधा केंद्रामध्ये 80 टक्के सहभाग शासनाचा आहे. या प्रकल्पातंर्गत खादी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सेतू केंद्राजवळ  विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.  याबाबतच्या शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आपल्या विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांना सदर विक्री केंद्रातून खादी वस्त्र खरेदी करण्यास प्रोत्साहित करून सोलर चरखा प्रकल्पातंर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.