गडचिरोलीत हत्ती हल्ल्यावर शासन गंभीर; सहपालकमंत्री जयस्वाल यांनी पिक नुकसानीची सखोल पाहणी केली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना होणाऱ्या नुकसानीवर आणि जीवितहानीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन गंभीर प्रयत्नशील आहे. हत्तींच्या हालचाली नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना ट्रॅकुलाइज करून वळविण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी देहरादून वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूटशी संपर्क साधण्यात येणार असल्याची माहिती वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिली. तसेच हा प्रश्न मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडून शास्त्रोक्त उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सहपालकमंत्री जयस्वाल यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींमुळे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीची सखोल पाहणी केली. या पाहणीवेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, उपवनसंरक्षक बी. वरूण यासह विविध प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते.

पिक नुकसानीची पाहणी आणि पंचनाम्यांचे निर्देश…

सहपालकमंत्री जयस्वाल यांनी चुरचुरा, पिपरटोला-धुडेशिवणी आणि दिभणा या गावांतील हत्तींमुळे झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केली. तसेच ठाणेगाव येथे अतिवृष्टीमुळे बाधित १२८ हेक्टर क्षेत्राची माहिती घेत प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून भरपाई प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले.

मयताच्या कुटुंबाला दिलासा

चुरचुरा येथील १० सप्टेंबर रोजी हत्ती हल्ल्यात मृत्यू झालेल्या वामन गेडाम यांच्या कुटुंबीयांना सहपालकमंत्री जयस्वाल यांच्या हस्ते १० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. एकूण २५ लाख रुपयांची मदत टप्प्याटप्प्याने दिली जाणार असून, या निर्णयामुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.

तक्रारींचे निवारण आणि जनता दरबार…

गावकऱ्यांशी संवाद साधताना शेतकऱ्यांनी हत्ती गावात येऊ नयेत अशी उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच नुकसानीसाठी येणाऱ्या अडचणी व विविध तक्रारी मांडल्या. यावर सहपालकमंत्री जयस्वाल यांनी वनविभागाने संवेदनशीलतेने वेळेवर मदत देण्याचे आदेश दिले आणि शासन लवकरच ५० हजार रुपये प्रति एकर भरपाईचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारींनुसार प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची हमी त्यांनी दिली.

पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी रणजित यादव व अनुष्का शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, तहसीलदार उषा चौधरी, तसेच राकेश बेलसरे व चंद्रशेखर भडांगे उपस्थित होते.

Ashish JaiswalElephant at gadchiroliElephant distorted cropgadchiroli forest
Comments (0)
Add Comment