लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलवादाच्या रक्तरंजित संघर्षात ज्यांनी आपले कर्ता पुरुष, आधारस्तंभ आणि आयुष्याची दिशा गमावली, अशा कुटुंबांसाठी शासनाने केवळ धोरणे आखून थांबू नये, तर त्यांच्यापर्यंत माणुसकीने पोहोचले पाहिजे—हा संदेश आज गडचिरोलीत प्रत्यक्षात उतरलेला दिसून आला. नक्षलपीडित कुटुंबातील पाल्यांना शासनसेवेत सामावून घेण्यात आलेल्या तरुणांशी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी साधलेला संवाद हा प्रशासकीय दौऱ्यापुरता मर्यादित न राहता, विश्वास, संवेदना आणि आशेचा आधार देणारा ठरला.
नक्षलवादी हिंसाचारात गोपनीय माहितीदारांची हत्या झालेल्या कुटुंबांना पुनर्वसनाचा आधार देण्यासाठी शासन निर्णयान्वये अशा कुटुंबातील एका सदस्यास शासकीय सेवेत सामावून घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयानुसार १ जानेवारी २०२६ रोजी नक्षलपीडित कुटुंबातील २९ तरुणांना जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत शिपाई पदावर नियुक्ती देण्यात आली. या नियुक्त तरुणांशी संवाद साधताना मुख्य सचिवांनी त्यांच्या आयुष्याच्या वेदनादायी टप्प्यांवर आपुलकीने हात ठेवत, प्रत्येकाची कहाणी जाणून घेतली.
“घटना कधी घडली? घरची परिस्थिती कशी आहे? कुटुंबात कोण-कोण आहेत?” अशा प्रश्नांतून त्यांनी केवळ माहिती घेतली नाही, तर शासन तुमच्या पाठीशी आहे, ही भावना उमेदवारांच्या मनात ठसवली. शासकीय सेवेत येणे म्हणजे केवळ रोजगार नव्हे, तर समाजासाठी काम करण्याची संधी असल्याचे सांगत, पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा, आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचा आणि प्रामाणिक सेवेच्या माध्यमातून स्वतःचे व कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
यानंतर मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाला आकस्मिक भेट देत, गरजू रुग्णांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. निधी मंजुरीची प्रक्रिया, उपचारासाठी दिली जाणारी आर्थिक मदत आणि लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचण्याचा कालावधी याबाबत त्यांनी सखोल माहिती घेतली. “गरिबांना मदत मिळताना वेळ, अडथळे किंवा दुर्लक्ष होता कामा नये; ही मदत मानवी संवेदनशीलतेने आणि पारदर्शकतेने मिळाली पाहिजे,” अशा ठोस सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर गोंडवाना विद्यापीठ परिसरातील सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT) येथे भेट देऊन मुख्य सचिवांनी विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधला. प्रशिक्षणाचा कालावधी, अभ्यासक्रमांची रचना, प्रमाणपत्रांची मान्यता, शिकविली जाणारी कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी याबाबत त्यांनी बारकाईने चौकशी केली. विद्यार्थ्यांना संगणकावर प्रत्यक्ष प्रकल्प सादर करण्यास सांगत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून गडचिरोलीतील युवक कसे स्पर्धात्मक बनू शकतात, यावर त्यांनी भर दिला.
दुर्गम आणि नक्षलप्रभावित जिल्ह्यातील युवकांसाठी हे प्रशिक्षण केंद्र स्वप्नांना दिशा देणारे व्यासपीठ असल्याचे नमूद करत, “या सुविधा केवळ पाहण्यासाठी नाहीत, तर स्वतःचा भविष्यकाल घडवण्यासाठी आहेत,” असे प्रेरणादायी शब्द त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.
या दौऱ्यादरम्यान विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रशांत बोकारे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी योगेंद्र शेंडे, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, वैद्यकीय कक्ष प्रमुख डॉ. मनोहर मडावी तसेच जिल्हा समन्वयक हर्षाली नैताम आदी मान्यवर उपस्थित होते.