लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
देसाईगंज : झाडीपट्टी नाट्यकलेच्या मागे महाराष्ट्र शासन ताकदीने उभे आहे. या कलेला राजाश्रय देणे ही आमची जबाबदारी आहे,असे प्रतिपादन सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले. देसाईगंज येथे आयोजित पाचव्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दहा लाखांचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. कलावंतांना मानधन, आरोग्य विमा आणि सुसज्ज नाट्यगृहासाठी शासन प्रयत्नशील आहे. देसाईगंज येथे वातानुकूलित नाट्यगृह उभारण्यासाठीही पावले उचलली जातील, अशी ग्वाही जयस्वाल यांनी दिली.
त्यांनी पुढे सांगितले की, सांस्कृतिक कार्य विभागाने झाडीपट्टी महोत्सवासाठी २३ लाखांचा निधी मंजूर केला आहे. तसेच रामटेक येथे चित्रपट नगरी उभारण्याची घोषणा करून झाडीपट्टीतील कलाकारांसाठी रोजगाराचे नवे दार खुले होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संमेलनाध्यक्ष प्राचार्य के. आत्माराम यांनी “खरा कलावंत तोच जो आयुष्यालाही रंगमंच मानतो” असे सांगत झाडीपट्टी रंगभूमीला राजाश्रय व प्रत्येक तालुक्यात नाट्यगृह उभारण्याची मागणी केली. हास्यसम्राट भारत गणेशपुरे यांनी “झाडीपट्टी ही सक्षम रंगभूमी असून तिला सर्वांनी मिळून पुढे नेणे गरजेचे आहे,” असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला आमदार रामदास मसराम, माजी आमदार कृष्णा गजबे, डॉ. परशुराम खुणे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा प्रशासन व झाडीपट्टी नाट्यसंमेलन समितीच्या आयोजनात नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला…