रत्नाकर चटप यांना ग्रामीण वार्ता पुरस्कार जाहीर

राजूरा तालुका ग्रामीण पत्रकार संघाचा पुरस्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचांदूर दि २६ डिसेंबर : दरवर्षी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्त राजूरा ग्रामीण पत्रकार संघातर्फे ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य करणा-या पत्रकारास पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदा स्वर्गीय राघवेंद्र देशकर स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा नामांकीत ग्रामीण वार्ता पुरस्कार नांदा येथील दै.लोकमतचे प्रतिनिधी रत्नाकर चटप यांना जाहीर झाला आहे. ८ जानेवारी रोजी राजूरा येथे आयोजित कार्यक्रमात खासदार बाळू धानोरकर, माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री हंजराज अहीर, आमदार सुभाष धोटे, शेतकरी नेते व माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. याआधी रत्नाकर चटप यांना श्रमीक पत्रकार संघाचा नामांकित मानवी स्वारस्य पुरस्कार व तरुण भारत प्रेसतर्फे सन्मानित करण्यात आले आहे.

रत्नाकर चटप हे पत्रकारीसोबतच उत्तम निवेदक, वक्ते, वादविवाद पटू व साहित्य क्षेत्रात राज्यात नामांकित लेखक तसेच कवी म्हणून सुपरिचित आहेत. ‘खडतर यात्रेचा वाटसरू’ हा चरित्रग्रंथ व ‘हुंदका’ कवितासंग्रह त्यांचा प्रकाशित आहे. राजुरा-कोरपना-जिवती परिसरात अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानची स्थापना करुन मागील दशकभरापासून साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व परिवर्तनवादी चळवळीत ते सक्रीय आहेत. परिसरात तीन राज्यस्तरीय अभंग साहित्य संमेलने त्यांच्या पुढाकाराने पार पडली. ते नांदा ग्रामपंचायतीचे सदस्य असून त्यामाध्यमातून ग्रामविकासातही योगदान देत आहेत.

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. तळागळातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत असतात. शेतकरी व ग्रामीण भागातील प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने मांडत राहील. समाजातील कष्टकरी घटकांच्या समस्या मांडणाऱ्यांना निश्चितच प्रोत्साहन देणारा हा पुरस्कार आहे, असे मत पुरस्कारार्थी रत्नाकर चटप यांनी व्यक्त केले. राजुरा तालुका पत्रकार संघ, कोरपना तालुका प्रेस क्लब, अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान व मित्रमंडळींनी रत्नाकर चटप यांचे अभिनंदन केले आहे.