गोंडवाना विद्यापीठात ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 7 नोव्हेंबर : ‘वंदे मातरम्’ या देशभावनेला चेतवणाऱ्या गीताला आज १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने गोंडवाना विद्यापीठात ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन उत्साहात पार पडले. शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठाच्या परिसरात सकाळी १०.३० वाजता झालेल्या या कार्यक्रमात देशभक्तीचा ओघ अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे, तसेच वित्त व लेखाधिकारी सी.ए. भास्कर पठारे यांची उपस्थिती होती.

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. बोकारे म्हणाले की, “भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात वंदे मातरम् गीताने देशभक्तांना प्रेरणेची नवी दिशा दिली. एका गीताने संपूर्ण क्रांतिकारकांना जागवले, हे जगातील दुर्मिळ उदाहरण आहे. बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीतून या गीताचा उदय झाला आणि त्याने स्वातंत्र्याची चेतना जागवली. आजच्या मुक्त वातावरणात आपण त्या काळातील गुलामीचे भय समजून घेतले पाहिजे आणि या गीतातील राष्ट्रभक्ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे.”

कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन अस्थापना विभागाचे उपकुलसचिव डॉ. कामाजी देशमुख यांनी केले. विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment