लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुलचेरा : वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे दि, २४ सप्टेंबर रोजी “कॅरिअर इन बँकिंग” या विषयावर प्रेरणादायी कार्यशाळा पार पडली. ही कार्यशाळा सहयोग मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून मिस झेबा खान (एच.आर. विभाग, सहयोग बँक) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील करिअरच्या असंख्य संधींचा सखोल परिचय करून दिला. फिल्ड ऑफिसरसह विविध पदांवरील नोकरीच्या संधी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, कौशल्य विकास, तसेच आर्थिक व्यवहारांची नवी क्षितिजे यांबाबत त्यांनी माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. वाढत्या डिजिटलायझेशनच्या पार्श्वभूमीवर बँकिंग क्षेत्रातील बदलते स्वरूप आणि रोजगारक्षमतेसाठी तरुणांनी घ्यावयाची तयारी यावर त्यांनी विशेष भर दिला.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंजीत मंडल होते. मंचावर डॉ. सचिन शेंडे, डॉ. स्वप्न बाचेर, डॉ. अशोक शेंडे, डॉ. अतुल पिंपळशेंडे, डॉ. दयाल रॉय तसेच प्रा. पुस्तोडे या मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे नेटक्या शब्दांत सूत्रसंचालन IQAC समन्वयक डॉ. ललितकुमार शनवारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहयोग बँक मुलचेरा शाखेचे व्यवस्थापक श्री. इश्वर रहांगदाले यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या उपक्रमाला लाभला. बँकिंग क्षेत्रातील करिअरची दिशा ठरवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा केवळ मार्गदर्शन नव्हे, तर प्रेरणादायी संधी ठरल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.