लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, : अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाने नवनिर्मित पोलीस मदत केंद्र बंगाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. या उपक्रमात बंगाडी व गुंडेनुर परिसरातील सुमारे ८० नागरिकांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी करून औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिरात फिजिशियन, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांची तपासणी केली. आवश्यकतेनुसार १० रुग्णांना पुढील उपचारासाठी विविध रुग्णालयात पाठविण्यात आले.
शिबिरादरम्यान बालकांची तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी व पोषणविषयक मार्गदर्शन देण्यात आले. तसेच विविध आजारांविषयी जनजागृती करण्यात आली. यासोबतच फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान, सी-६० दलाचे शौर्य आणि पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.
गडचिरोली पोलीस दलाने २०२१ पासून आतापर्यंत १९१ आरोग्य शिबिरांद्वारे सुमारे ४२ हजार नागरिकांची तपासणी केली असून, रक्तदान व नेत्र तपासणीसारख्या उपक्रमांमधूनही मोठ्या प्रमाणात सेवा दिली आहे.