“आरोग्य हाच खरा धन” – गडचिरोलीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली: शहरातील श्री साई गणेश मित्र मंडळ, रेड्डी गोडाऊन चौक, धन्वंतरी हॉस्पिटल व सिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे लक्ष देणे ही काळाची गरज बनली असताना या शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक माधुरीताई किलनाके यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, डॉ. अनंत कुंभारे, डॉ. यशवंत दुर्गे, डॉ. खुशबू दुर्गे, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, डॉ. अमित साळवे, डॉ. रूपाली पाटील, डॉ. राकेश चहांदे, डॉ. प्रफुल वाळके, डॉ. रोहन कुमरे, डॉ. निखिल चव्हाण यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्यसेवक उपस्थित होते.

तपासणीसाठी आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी यासह विविध निदान चाचण्या या ठिकाणी केल्या गेल्या. श्याम सरदार (टेक्निशियन) यांनी तांत्रिक सहाय्य केले.

या प्रसंगी ज्येष्ठ नेते प्रा. राजूभाऊ कात्रटवार, माजी नगरसेवक प्रकाश ताकसांडे, प्रा. रमेशभाऊ चौधरी यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष राकेशभाऊ नागरे व सदस्य शेखरजी साळवे, विनोद मैंद, प्रकाश निकुरे, विष्णू कांबळे, मनिष हुसकूले, रोशन आखाडे, सर्वेश पोपट, गौरव डोईजड, नितीन निंबोरकर, कुणाल मांडवगडे, चैतन्य चडगुलवार यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले.

शिबिरात महिला, बालक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने तपासणीसाठी सहभागी झाले. “आरोग्य हेच खरे धन असून समाजाने एकत्र येऊन निरोगी जीवनशैलीचा प्रसार केला पाहिजे,” असा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.

गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात आरोग्यसेवेचा विस्तार होणे आणि नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे, हा सकारात्मक बदल मानला जात आहे. अशा शिबिरांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होऊन आरोग्य जागृतीचा संदेश समाजात रुजत आहे.

Comments (0)
Add Comment