5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, गोसे धरणाचे 33 दार उघडले, शाळा कॉलेजला सुट्टी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भंडारा, 20 जुलै – भंडारा जिल्ह्यात रेड अलर्ट नंतर संपूर्ण जिल्ह्यात पावसाने जोरदार जोरदार बॅटिंग केली. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे भंडारा, लाखनी साकोली, लाखांदूर, पवनी, या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. सर्वाधिक पाऊस हा लाखांदूर मध्ये बरसला असून तब्बल 241 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. त्यानंतर पवनी 197.8, भंडारा 106, लाखनी 96. 3, साकोली 73 तुमसर 40.2 आणि मोहाडी 55.6 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.

जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सर्व शाळा आणि कॉलेज यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र सकाळच्या सत्रात सुरू झालेल्या शाळानी जिल्हाधिकारीच्या आदेशानंतरही शाळा सुरूच ठेवल्या. वैनगंगा नदी क्षेत्रात आणि गोसे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने गोसे धरणाचे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 33 ही दार उघडण्यात आले आहेत. यापैकी 13 दार 1 मीटरने तर 20 दार अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेले असून यामधून 5022. 07 क्युमेक्स एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदी किनाऱ्याच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
नदी नाले ओसंडून वाहत असल्यामुळे 19 रस्ते हे सध्या रहदारीसाठी बंद करण्यात आलेले आहे. भंडारा शहरातील काही घरांमध्ये पाणी शिरलेला आहे तसेच तुमचा शहरातील बऱ्याच ठिकाणी घरामध्ये पाणी शिरला आहे रस्त्यावरील पाणी जमा झाल्याने नागरिकांना रहदारीसाठी अडचण निर्माण होत आहे.