लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई: पूर्व विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून गडचिरोली ते नागपूर (आरमोरी) मार्ग बंद झाला आहे तर नागपूर शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे, मात्र संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) तातडीसाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
गोसीखुर्द धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गडचिरोली जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि पर्यायी मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे, काही प्रवासी एसटी बसमध्ये अडकले होते त्यांना जवळील शाळेत स्थलांतरित करून सुरक्षितपणे घरी पोहचवण्यात आले आहे, नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी कारण आजही ऑरेंज अलर्ट लागू असून हवामान विभागाच्या सूचनांनुसार प्रशासन सर्व परिस्थितींवर लक्ष ठेवून आहे, सध्या एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली असून शोधकार्य सुरू आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे स्पष्ट आवाहन केले आहे.