लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: आरमोरी शहरातील येथील लालानी मोटर्स या हिरो कंपनीच्या टू-व्हीलर गाड्यांच्या शोरूमची इमारतची भिंत आज पाच च्या दरम्यान अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर प्रशासन, अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
मृतांमध्ये तहसीन शेख (वय ३०, रा. वडसा), अफसान शेख (वय ३२, रा. वडसा) आणि आकाश बुरांडे (रा. निलज) यांचा समावेश आहे. या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, गंभीर जखमींमध्ये सौरभ चौधरी (रा. मेंडकी, जि. चंद्रपूर), विलास मने (वय ५०, रा. आरमोरी) आणि दीपक मेश्राम (वय २३, रा. आरमोरी) यांचा समावेश असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
इमारतची भिंत कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बचाव पथकांकडून जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवून शोधमोहीम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी परिसर सील करून वाहतूक व नागरिकांची गर्दी नियंत्रणात आणली आहे.
या दुर्घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत असून, जुन्या वा जीर्ण इमारतींच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने तातडीने तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
बेजबाबदार इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासनावर गुन्हे दाखल करा; शेतकरी कामगार पक्ष व आझाद समाज पक्षाची मागणी..
आरमोरी येथे जूनी इमारत भिंत कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू व तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. इमारती मोडकळीस आल्यानंतरही इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि निष्पाप लोकांचा बळी गेला. याला सर्वस्वी इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासन जबाबदार असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांचे विरोधात हत्येचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई जराते, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, धर्मानंद मेश्राम, विनोद मडावी यांनी केली आहे.
प्रशासन व लोकप्रतिनिधींची धाव — शोकाकुल कुटुंबियांना दिलासा…