हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. ५ डिसेंबर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील या प्रकारचा सर्वोत्तम महामार्ग ठरेल. या महामार्गाची कामे गतीने होत असून, येत्या सहा महिन्यात शिर्डीपर्यंत हा मार्ग खुला होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज अमरावती जिल्हयातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूरनजिक समृद्धी महामार्गाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार वीरेंद्र जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव अनिल गायकवाड, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधिक्षक हरी बालाजी आदी उपस्थित होते.

नागपूर- मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्गाची अमरावती जिल्ह्यातील लांबी सुमारे ७४ कि. मी. असून, मुख्यमंत्री ठाकरे यांनी पूर्ण झालेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली, तसेच सहा किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करून पाहणी केली व कामाचा दर्जा, गुणवत्ता व वेग याबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. समृद्धी महामार्गाची कामे लॉकडाऊन काळातही सुरू होती. त्यामुळे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा हा प्रकल्प आहे. हा महामार्ग देशातील सर्वोत्कृष्ट मार्ग ठरेल. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीपर्यंत येत्या १ मेपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. त्यानंतर पुढील वर्षात संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होऊन वाहतूक मुंबईपर्यंत सुरळीत होईल.

राज्यातील इतर रस्त्यांच्या बांधकामे गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यालयीन वेळेत खेळ रंगला क्रिकेटचा. ही बातमी अवश्य बघा.