गडचिरोलीच्या दुर्गम विद्यार्थ्यांचे ‘इस्रो’कडे ऐतिहासिक उड्डाण

मुख्यमंत्री फडणवीस, मंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूर विमानतळावरून विद्यार्थ्यांचे दिमाखात प्रस्थान..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली/नागपूर, १५ जून : अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या पार्श्वभूमीतील १२० विद्यार्थी आज इतिहासाच्या पानांवर आपल्या पंखांची नोंद करून गेले. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, वांगेपल्ली (अहेरी) आणि नवेगाव येथील निवासी शाळांमधील हे विद्यार्थी आज नागपूर येथून थेट भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) मुख्यालयाकडे – बंगळुरूकडे – विमानाने रवाना झाले.

या प्रेरणादायी उपक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः नागपूर विमानतळावर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पाठबळ दिलं.

 

“मुलांनो, मोठं स्वप्न बघा, कठोर अभ्यास करा, आणि यश नक्की मिळवा,”

अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या सोबत संवाद साधताना त्यांनी, विद्यार्थी कुठे जात आहेत, काय पाहणार आहेत, याची आस्थेने चौकशी केली.

पहिल्यांदाच विमानप्रवास, काहींनी जिल्ह्याचं मुख्यालयही पाहिलं नव्हतं!

गडचिरोलीतील या विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास केवळ भौगोलिक अंतर पार करण्याचा नव्हता, तर तो त्यांच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात होती. अनेक विद्यार्थी असे होते, ज्यांनी आजवर जिल्ह्याचे मुख्यालयही पाहिले नव्हते, तर काहींनी रेल्वेही प्रत्यक्ष पाहिलेली नव्हती. अशा पार्श्वभूमीतून आलेल्या या विद्यार्थ्यांचा थेट इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला दिलेला भेटीचा संधी त्यांच्यासाठी स्वप्नवत ठरली आहे.

या योजनेमागे डॉ. सचिन मडावी यांची दूरदृष्टी…

या अभूतपूर्व योजनेची संकल्पना समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी मांडली होती. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या प्रस्तावाला तत्काळ मान्यता दिली आणि पुढाकार घेत संपूर्ण योजनेला मूर्त स्वरूप दिलं. राज्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी या योजनेसाठी निधी मंजूर केला.

विद्यार्थ्यांना गडचिरोली येथून बसद्वारे नागपूर विमानतळावर आणण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी आणि प्रकल्प अधिकारी चेतन हीवंज आदी मान्यवर उपस्थित होते.

मुलांच्या डोळ्यात स्वप्नं, पालकांच्या डोळ्यांत अश्रू!..

विद्यार्थ्यांच्या या प्रवासाचा क्षण केवळ त्यांच्याच नव्हे, तर त्यांच्या पालकांच्याही आयुष्यात अविस्मरणीय ठरणारा ठरला. “आमचा मुलगा विमानाने जाणार…” एवढ्याशा वाक्यातून अनेकांचे डोळे पाणावले. ही संधी मुलांना मिळावी म्हणून शिक्षण विभागाने आणि स्थानिक प्रशासनाने सातत्याने प्रयत्न केले, याचं समाधान पालकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं.

इस्रो — विज्ञान, आत्मविश्वास आणि प्रेरणेचा केंद्रबिंदू..

भारतीय अवकाश संशोधन संस्था ही केवळ तंत्रज्ञानाचा गाभा नाही, तर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्थान आहे. चंद्रयान, मंगळयान, आणि अद्ययावत रॉकेट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इस्रोने भारताला जागतिक अवकाश महासत्ता म्हणून अधोरेखित केलं आहे. या विद्यार्थ्यांना थेट इस्रोच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव देणं हे त्यांच्यासाठी केवळ शैक्षणिक नव्हे, तर जीवनविवेकासाठीही अत्यंत मोलाचं आहे.

शासनाचे अभिनव पाऊल : दुर्गम भागातून आत्मविश्वासाच्या आकाशात उड्डाण..

हा उपक्रम केवळ सहल नसून, तो दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकाश दिल्याचा प्रतीक आहे. हा प्रकल्प ‘सुधारणेची सुरुवात शिक्षणातून’ या विचाराशी निष्ठावान असून, तो इतर जिल्ह्यांसाठीही एक अनुकरणीय नमुना ठरण्याची शक्यता आहे.

Cm devdendra FadnavisGadchiroli students going to ISROISRO visit gadchiroli students