लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
आरमोरी: वैरागड – करपडा मार्गावर ट्रकने विरुद्ध दिशाने येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले. यानंतर चालक ट्रकसह पळून गेला. ही घटना २३ डिसेंबरला दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास घडली.
शुभम मेश्राम (१८) शुभम कोहपरे (२२, दोघेही रा. गणेशपूर, ता. आरमोरी) अशी जखमींची नावे आहेत. ते दोघे दुचाकीवरून वैरागडला येत होते. वैरागडवरून पुढे धानोरा रांगीकडे जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर ट्रक घेऊन चालक पसार झाला.
आरमोरी तालुक्यातील दवंडी येथील घाटावरून रात्र दिवस रेतीची टिप्परने वाहतूक सुरू आहे. या मार्गाने ही वाहतूक चालत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघात वाढले आहेत. जखमींना आरमोरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी भरती करण्यात आले. पण दोन्ही तरुणांच्या हात पायांना गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरीच्या (जि. चंद्रपूर) खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालकाचा शोध सुरू आहे.