अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अहेरी तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी; प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत तातडीचा निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, २४ जुलै २०२५ : भारतीय हवामान विभागाच्या ताज्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यासाठी २५ जुलैसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याअनुषंगाने अहेरी तालुक्यातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाने २५ जुलै रोजी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करत, जिल्हाधिकारी कार्यालयाने “कोणत्याही संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी” हा निर्णय घेतला आहे. २४ जुलै रोजी जिल्ह्यातील अनेक मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली असून, पूर आणि अन्य आपत्तीजनक स्थिती उद्भवू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून ही तातडीची घोषणा करण्यात आली आहे.

प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी व विभागप्रमुख यांना जबाबदार धरले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हा आदेश आजच दिनांक २४ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सही व शिक्क्यानिशी तात्काळ अंमलात आणण्यात आला असून, पालक, विद्यार्थी, शिक्षक व सर्व नागरिकांनी याची गंभीर दखल घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

school offweather report