लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरासह सर्व नगरपरिषद क्षेत्रात वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करून ती काटेकोरपणे अंमलात आणावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. नागरी वस्तीतून जाणाऱ्या वाहनांच्या बेकाबू वेगामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने या उपाययोजना तातडीने हाती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेषत: २०१८ पूर्वीची जड वाहने वेगमर्यादा नियंत्रित करणाऱ्या चिपसह चालविण्यात येतात का, याची काटेकोर तपासणी करण्याचाही आदेश त्यांनी संबंधित विभागांना दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील अपघातस्थिती, वाहतूक व्यवस्थापन आणि तातडीच्या उपचारप्रणालीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे, अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने उपचार मिळणे जीवनरक्षणासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका पोहोचण्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला. जिल्ह्यात १०८ सेवेच्या केवळ १० रुग्णवाहिका कार्यरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, १०२ सेवेच्या ४० रुग्णवाहिकाही अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. अपघातस्थळी त्वरित मदत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांमध्ये सुसूत्र समन्वयाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासून रस्ता सुरक्षा नियमांची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी गडचिरोली शहरात स्वतंत्र ट्रॅफिक पार्क उभारण्याबाबत अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. दरम्यान, ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’, राँग साईड, हेल्मेट व सीटबेल्ट या मोहिमांअंतर्गत झालेल्या कारवाईचाही आढावा घेण्यात आला. तसेच जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत सर्वाधिक तक्रारी राष्ट्रीय महामार्गासंदर्भात असल्याचे समोर आले असून, तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचा आदेश देण्यात आला.
रस्ता सुरक्षा उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग व पोलिस विभाग यांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, अशा स्पष्ट शब्दांत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीचा समारोप केला. बैठकीस वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शरद मेश्राम, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.