लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 12 एप्रिल :-वसतिगृहाच्या कंत्राटी चौकीदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज भामरागड येथील समग्र शिक्षा अभियानाच्या वसतिगृह अधीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकान्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली. भिमराव उद्धव अवतरे (५३) असे आरोपीचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा भामरागड येथील वसतिगृहात कंत्राटी चौकीदार म्हणून कार्यरत आहे. त्याच्या मानधनात दरमहा तीन हजार रुपयांची वाढ करुन त्यास कंत्राटी चौकीदार पदावर नियमित करण्याच्या कामाकरिता वसतिगृह अधीक्षक भिमराव अवतरे याने त्यास ५ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यानी आज सापळा रचून भिमराव अवतरे यास ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड, सहायक फौजदार प्रमोद ढोरे, हवालदार नत्थू थोटे, राजू पद्मगिरवार, श्रीनिवास संगोजी, स्वप्नील बांबोळे, किशोर जौंजारकर, संदीप घोरमोडे, किशोर ठाकूर, संदीप उहाण, विद्या म्हशाखेत्री, जोत्स्ना वसावे, तुळशीराम नवघरे यांनी ही कारवाई केली.
हे पण वाचा :-