एचपीव्ही लसीकरण मोहिमेने गडचिरोलीत उभारला ‘आरोग्याचा संरक्षण कवच’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

हेडरी (गडचिरोली) ९ : जिल्ह्यात आजपासून “गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी एक नवीन पान उलगडले आहे”. जागतिक आदिवासी दिनानिमित्त लॉईड्स काली अम्मल मेमोरियल (एलकेएएम) हॉस्पिटलने ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) प्रतिबंधक लसीकरणाचा ऐतिहासिक उपक्रम सुरु करत सामुदायिक आरोग्य रक्षणाचा नवा मानदंड प्रस्थापित केला.

शनिवारी एलकेएएम हॉस्पिटल, हेडरी येथे झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या संचालक कीर्ती कृष्णा आणि प्रकल्प संचालक सुनीता मेहता यांनी मोहिमेचे उद्घाटन केले. यावेळी वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाल रॉय, बालरोगतज्ज्ञ डॉ. आकांश रेड्डी, तसेच वरिष्ठ नर्सिंग अधिकारी कविता दुर्गम उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात ९ ते ११ वर्षे वयोगटातील शालेय मुलींना आणि लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या महिला कर्मचाऱ्यांना एचपीव्ही लसीचा पहिला डोस मोफत देण्यात आला. या मोहिमेत मुलींच्या भविष्याच्या आरोग्याला ‘संरक्षणाचा धागा’ बांधण्याचा भावनिक संदेशही देण्यात आला, जो राखी सणाच्या निमित्ताने अधिक प्रतीकात्मक ठरला.

उद्घाटनावेळी कीर्ती कृष्णा यांनी सांगितले की, “गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांचा जीव घेणाऱ्या आजारांपैकी एक आहे. त्यावर उपाय म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरण ही सर्वात प्रभावी ढाल आहे. हा उपक्रम केवळ आरोग्याचे संरक्षणच नाही, तर मुलींच्या आत्मविश्वासपूर्ण आयुष्याची हमी आहे.”

 

डॉ. गोपाल रॉय यांनी स्पष्ट केले की एचपीव्हीमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण ग्रामीण व आदिवासी भागात लक्षणीय आहे, आणि लसीकरण मोहिमेमुळे भविष्यातील गंभीर आजारांची जोखीम मोठ्या प्रमाणात कमी करता येईल.

लॉईड्स राज विद्या निकेतन (एलआरव्हीएन) टीमने एलएमईएलचे एमडी आणि एलआरव्हीएनचे अध्यक्ष बी. प्रभाकरन आणि कीर्ती कृष्णा यांचे मुलींना मोफत लसीकरण उपलब्ध करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

एचपीव्ही लसीकरण — महिलांसाठी शिफारस केलेले वेळापत्रक..

९–१४ वर्षे: दोन डोस, दुसरा डोस पहिल्या डोसनंतर ६ महिन्यांनी.

१५–२६ वर्षे: तीन डोस, दुसरा डोस पहिल्यानंतर २ महिन्यांनी आणि तिसरा डोस ६ महिन्यांनी.

ही सेवा एलकेएएम हॉस्पिटलतर्फे पूर्णपणे मोफत दिली जाणार असून, या उपक्रमातून गडचिरोली जिल्ह्यातील महिलांसाठी कर्करोग प्रतिबंधक चळवळीला नवी ऊर्जा मिळणार आहे.

Lloyd hospitalLMLE