अजूनही लग्न समारंभाला शेकडोंची गर्दी

दोन मॅरेज हॉलवर महापालिका पथकाची धडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

उल्हासनगर, दि. २२ मार्च: राज्यातील अनेक मुख्य शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिक मात्र अजूनही निश्चिंत आहेत, याचाच प्रत्यय ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात आला आहे.

उल्हासनगर शहरात कॅम्प नंबर दोनच्या हिरा मॅरेज हॉल आणि मोनिका मॅरेज हॉल या दोन्ही हॉलमध्ये शेकडोंच्या गर्दीत रविवारी दोन विवाह सोहळे पार पडले. लग्न समारंभाला पन्नास पेक्षा जास्तीच्या गर्दीला परवानगी नसताना नागरिक मात्र या नियमांकडे दुर्लक्ष करून त्याचे सर्रासपणे उल्लंघन करताना दिसत आहेत. इथल्या दोन्ही लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी तर होतीच त्याचबरोबर मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला होता.

उल्हासनगर महापालिका पथकाला या लग्न समारंभाची माहिती मिळताच त्यांनी दोन्ही हॉल वर धाड टाकत या दोन्ही मॅरेज हॉलवर दंडात्मक कारवाई करून चाळीस हजारांचा दंड वसूल केला आहे. उल्हासनगर शहरात अजूनही अनेक सोहळे छुप्या पद्धतीने पार पडत असल्याने सामूहिक संसर्गाचा धोका वाढत आल्याने या शहरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे.